महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आता मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे. ईडीने त्यांच्याविरोधात मनी लाँड्रींगची केस दाखल केली आहे. हा खटला रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.
नवाब मलिक यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय की, त्यांना करण्यात आलेली अटक हे बेकायदेशीर आहे. तसेच त्यांना ताबडतोब मुक्त करण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी या याचिकेत केली आहे.
नवाब मलिक यांच्यावरील कारवाई सध्या सुरु असतानाच त्यांचा मुलगा फराझ मलिक यांना देखील ईडीचे समन्स पाठवण्यात आले आहेत. फराझ मलिक आजच ईडी कार्यालयात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. नवाब मलिक यांना २५ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.