‘गर्व करू नये, गर्वाचं घर नेहमी खाली असतं’ हे आपण बर्याचदा ऐकलंय आणि हे तितकच खरं देखील आहे. पण गर्वापेक्षा जर काही भयंकर असेल तर तो आहे अहंकार. रावण हा रामापेक्षा ही चांगला आणि देवमाणुस होता पण त्याच्या अहंकारासमोर त्याचा स्वतःचा चांगुलपणा टिकू शकला नाही. किंबहुना अहंकारामुळे रामायण घडलं.थोडक्यात काय तर अहंकार बरा नाही म्हणून आपण तो बर्याचदा आपल्या अंगवळणी लावत नाही आणि आपल्या संपर्कात असलेल्या अहंकारी माणसाला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि समजून घेता घेता त्यांच्या अहंकाराच्या हट्टापायी आपण आपला आत्मसन्मान आणि स्वाभिमान गमावतो. आणि जेव्हा याचा अतिरेक होऊ लागतो तेव्हा आपण आपल्याच माणसांपासून दुरावतो. शेवटी समाजात आत्मसन्मान आणि स्वाभिमानासाठी लढणाऱ्या माणसाला वाईट समजलं जातं. जर मुळात अहंकारच नसेल तर बाकी गोष्टी घडणारच नाहीत. पण हे काही माणसांसाठी अशक्य आहे. त्यांना त्यांचा अहंकार सोडवत नाही आणि आपल्याला त्यांना गमवता येत नाही.तेव्हा अहंकार की नातं? प्रत्येक व्यक्ती आपापल्या जागी बरोबर असतो, पण याचा अर्थ असा होत नाही की आपण एकटे बरोबर आणि इतर सगळे चुकीचे आहेत. अहंकारापायी काही वेळा माणसं दुरावतात तर काही वेळा माणसातला ‘आपला माणूस’ दुरावतो. अहंकारामुळे आपण नेमकं काय गमावतोय हे आपल्यालाच आपलं समजत नसतं, एखाद्या शहाण्या माणसाने सोंग ओढल्यासारखं वागत असतो आपण. अहंकाराची पट्टी डोळ्यांवर घट्ट बांधून घेतो, वाट्टेल तसं समोरच्या माणसांशी बोलतो, त्यांना शाब्दिक मार देऊन दुखावतो. आपल्या मनासारखं झालं नाही तर हट्ट करतो, समोरच्या माणसावर अविश्वास दाखवून त्याच्यात असला नसला सगळा आत्मविश्वास मारून टाकतो. एवढा भयंकर असतो अहंकार…तेव्हा अहंकार की नातं?ज्याने त्याने आपआपलं निवडावं, शेवटी जिंकणं महत्त्वाचं आहे ना!– प्राची मोहिते