ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असं सांगतानाच ओबीसींचं आरक्षण घालवून या सरकारने ओबीसींच्या भविष्याचा खेळ खंडोबा केला आहे. त्याविरोधात येत्या 26 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आज ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. सुमारे तीन तास ही बैठक चालली.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची घोषणा केली. महाविकास आघाडीच्या चुकीमुळे ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. राज्य सरकारने ओबीसींचं राजकारण संपवलं आहे. त्यामुळेच या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही येत्या 26 जून रोजी चक्काजाम आंदोलन करणार आहोत, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.