कोरोना व्हायरसने संपूर्ण जगालाच मोठा धक्का दिला आहे. आज 21 व्या शतकात विश्वातील प्रत्येक गोष्ट मुठीत आली असे म्हणत असतानाच मानवाला एका व्हायरसने मानवी मर्यादांची जाणीव करून दिली आहे. त्याची निर्मिती कशी झाली.? कुणी अन काय चुका केला.? हे वाचल्या नंतरचे प्रश्न. आज तरी हे संकट टाळावं कसं अन याला रोखावं कसं.? या विवंचनेत सारं जग आहे. पण यातही काही सकारात्मक शोधलं पाहिजे…!
कालपर्यंत बिझी.. बिझी.. अन प्रचंड बिझी… असणारा माणूस झटक्यात बिनकामी अन स्थिर झाला आहे. कोट्यवधी लोकं आपल्याच घरात जायबंदी झालेली व एकाच वेळी अख्ख्या जगावर असं काही संकट आलेलं अन जग हतबल झालेलं आमची पिढी प्रथमच पाहत आहे. पण आपण हा निसर्गाचा असा संदेश घेऊ की, निसर्गाने धावत्या जगाला, हापापलेल्या माणसाला स्वतः ला अपग्रेड करायला सर्वाना सारखा वेळ दिलाय. एकाच वेळी सर्वाना बाकी सगळं सोडून स्वतः कडे पाहायला घरात शांत बसवलंय. माणसाला माणसांची काळजी करायला, आपल्या माणसांना बोलायला त्यांना समजून घ्यायला. जगात माणसा माणसातला संवाद वाढायला एक संधी दिलीय.
मग आता प्रत्येकजण या संधीचा उपयोग कसा करतोय.? घरात फक्त बोअर होतंय म्हणत.. आता जगाचं कसं होणार.? या गप्पा मारत, की मिळालेल्या या वेळेत आयुष्यात जे वाचायचं राहून गेलं ते वाचून काढतोय, जे बोलायचं राहून गेलं ते बोलतोय, जे लिहायचं राहून गेलं ते लिहितोय..जी कला, जो छंद शिकायचा राहिला तो शिकतोय… या धावत्या देहाला व मनाला ध्यानस्थ करून शांती देतोय की याहून आणखी नव्या गोष्टी करून स्वतः ला अपग्रेड करतोय, हे सगळं मी जगदीश ओहोळ सांगतोय म्हणून करू नका..! तर उद्या हे संकट दूर झाल्यावर, अरे या संकटाने मला आयुष्यात कधी नव्हे ते सलग 15-20 दिवस शांत बसवलं, मग मी तेव्हा काय केलं.? याचं उत्तर तुम्हाला स्वतःला देत यायला पाहिजे.
तोवर घरात राहून सतत ‘या कोरोनाने घरात बसवलं, माझं लय नुकसान झालं’ असं म्हणत चिंता करणाऱ्यांनो फक्त तुम्हीच नाही सारं जग थांबलय, “तुम्ही झोपेत आहात आणि रात्री लांबलीय” असा विचार करा आणि मनात जपलेली स्वप्न या रिकाम्या वेळेत पूर्ण करा. कोरोनाचं हे वादळ निघून जाईलच पण या वादळाने मला काय शिकवलं हे तुम्हाला स्वतः ला, जगाला व पुढच्या पिढीला सांगता आलं पाहिजे.
“है कोरोना.. लेकीन तुम अपने आपको अपग्रेड करोना.।
– जगदीश ओहोळ, व्याख्याते