मुंबई | महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक संशोधन मंडळाने इयता दहावीच्या अभ्यासक्रमातील कुमारभारती पुस्तक प्रकाशित केले असून ह्या पुस्तकात साहित्य अकादमीचे युवा पुरस्कार विजेते डाॅ. वीरा राठोड यांच्या कवितेला समाविष्ट करण्यात आले आहे. ‘मनक्या पेरेन लागा’ अर्थातच ‘माणसं पेरायला लागू’. मूळ कविता ही बंजारा बोलीभाषेतील आहे. या कवितेचे अनुवाद ख्याडा व बबन चित्रपटाचे गीतकार डाॅ. विनायक पवार यांनी केलय.
रचनात्मक लेखनकौशल्य आणि सामाजिक बांधिलकी या दोन्ही गोष्टींमुळे डाॅ. राठोड सर्वश्रृत आहेत. या कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम घडेल यात किंचितही शंका नाही.
“व्यक्तीच्या जगण्याचा प्रवास हा संघर्षाने भरलेला आहे. अगणित समस्यांशी सामना करतच त्याला सिध्द व्हावे लागत असते. या संघर्ष भरल्या वाटेवरून चालण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रेरणांचीही गरज असते. हे जगण्यासाठीचे इंधन जसे त्याला अनेकानेक बाबींतून मिळते तसेच साहित्यातूनही मिळत जाते. तशी तर निसर्गाने सृष्टीतल्या प्रत्येक घटकात लढण्याची क्षमता निर्माण केलेली आहे. फक्त त्या घटकाला त्याची जाणिव व्हावी लागते, ती झाल्यास हरएक जण लढायला आपोआपच तयार होत असतो. याही उपरोक्त काहींमध्ये जगण्याविषयी, जगाविषयी, लढण्याविषयी, संवेदना निर्माण करावी लागत असते अशी प्रेरणा साहित्यातून समाजाला आणि शालेय अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना देण्याचा आपला प्रयत्न असतो. मला वाटतं आपण जसे बी लावून झाडं जपतो तसेच विचार पेरणारी माणसं जपली पाहिजेत आणि त्यांच्या सम्यक समाजनिर्माणक कार्यास पुढे नेलं पाहिजे . कारण दुष्काळात चार दाणे पेरले पोसले जोपासले राखले तर हजार दाण्यांची सुगी आपल्या हाताशी लागते. माणूसकीचा दुष्काळ पडल्याच्या काळात जर चांगली माणसं त्यांचा विचार जपला जोपासला तर नक्कीच पुन्हा माणसांचा , माणूसकीचा काळ येईल. म्हणून माणसं पेरणं गरजेचं आहे असं मनोमन वाटतं.”
– डाॅ. वीरा राठोड