वर्षा ऋतू अर्थात पावसाळा हा सर्वांचाच आवडता ऋतू आहे. या ऋतूची लोक आतुरतेने वाट पाहतात. या ऋतूत सूर्याच्या उष्णतेपासून व चिंब करणाऱ्या घामापासून आराम मिळतो, हे तितकेच खरे आहे. परंतु या ऋतूमध्ये आपल्याला अन्न पाण्याच्या सर्वच गोष्टीवर लक्ष ठेवावे लागते. पावसाळ्यात विविध आजारांचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असते. पावसाळ्यात विविध जिवाणू आणि पदार्थावर बुरशी लागून संसर्ग होण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे आपल्याला उन्हाळ्याच्या तीव्रतेपासून थोडा दिलासा जरी मिळत असला तरी, मान्सूनचा काळ आपल्या आरोग्यासाठी तितकाच अवघडही ठरू शकतो. तेव्हा आपल्याला या मोसमात थोड्या प्रमाणात का होईना पण जीवनशैली बदलने आवश्यक ठरते.
हिरव्या पालेभाज्या :
हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी हितकारक यात काहीच वाद नाही. परंतु पावसाळ्यात या भाज्यांमध्ये अति ओलावा असतो, यातील ओलेपणामुळे विविध जंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते. तर किमान पावसापूरता हिरव्या भाज्यांना निरोप द्यायला हरकत नाही.अगदीच खाव्याश्या वाटल्या तर किमान २ ते ३ वेळा भाज्या धुऊन घ्याव्यात. शक्यतो या ऋतूत आहारात कडधान्यांचा वापर योग्य राहील.
सीफूड :
पावसाळ्यात मासे आणि कोळंबीच्या प्रजननाचा काळ असल्याने ते टाळले पाहिजे. मांसाहारींनी याबाबतीत सजग राहावे लागणार आहे.
तेलकट आणि तळलेले अन्न :
तळलेले तेलकट अन्न शरीरात उष्णता वाढवण्याचे काम करत असते व डिहायड्रेशनसाठी कारणीभूत ठरते, जे पावसाळ्यात धोकादायक असते. तेव्हा जंकफूड अर्थात बर्गर आणि फ्रेंच फ्राईंसला निरोप द्या. या पदार्थांमुळे हृदय संबंधित समस्या उद्भवू शकते आणि शरिरातील रक्त-साखरेची पातळी वाढू शकते.
कार्बोनेटेड पेय- शीत पेय :
कार्बोनेटेड पेये आपल्या शरीरातील खनिज पातळी आणि आपल्या शरीरात निर्माण होणारे पचनक्रिया करणारे द्रव्य कमी करतात, यामुळे अपचन होते. हायड्रेटेड राहण्यासाठी खूप पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच हर्बल टी आणि होममेड सूप्स सारख्या गरम पेयांना प्राधान्य द्यावे.
मद्यपान :
पावसाळ्यात मद्यपान करण्याची लहर बर्याच लोकांना येत असते, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. पावसाळ्याच्या वेळी अल्कोहोलयुक्त पेयांचे सेवन केल्याने शरीराचे डिहायड्रेशन होते. त्यामुळे अती मद्यपान करणाऱ्या लोकांनी याचे प्रमाण मर्यादित करणे गरजेचे आहे.
कापलेली फळे आणि फळांचा रस :
बराच वेळ कापून ठेवलेली फळे व काढून ठेवलेला फळांचा रस, यावर माशा आणि इतर कीटकांद्वारे ते दूषित होण्याचा धोका जास्त असतो. यामुळे पोटात विषबाधा होऊ शकते. त्यामुळे ताजी फळे स्वच्छ धुवून घ्यावी.
दूग्ध उत्पादने :
दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचे सेवन प्रतिबंधित करा. कारण दूधाचे पदार्थ दूषित होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच, दूधात जंतू आणि बॅक्टेरियांनी भरलेले असते जे पावसाळ्यात साथीच्या आजाराचे संक्रमण पसरविण्याचा धोका वाढवतात.