मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज भेट मुंबईत झाली. या भेटीत भाजप-मनसे युतीची चर्चा झालेली नाही. तर, परप्रांतियांच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या बैठकीत मनसे- भाजप भेटीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, परप्रांतियांना राज ठाकरे यांचा विरोध नाही, मात्र त्यांनी व्यवहारात दाखवावे, असे पाटील यांनी म्हटले आहे. दोन हिंदू माणसं एकमेकांची भेट घेतात तेव्हा एकमेकांना पुन्हा भेटू असे म्हणतात, असे सांगत अशा भेटी भविष्यातही होतील याचे त्यांनी यावेळी सुतोवाच केले. त्याचवेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, ही जनतेच्या मनातली इच्छा मी त्यांच्यासमोर व्यक्त केली, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.