भारताची लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी पत्रकारितेचं मोठं योगदान आहे हे नाकारून चालणार नाही. कारण, पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून समाजाची जाण असलेल्या पत्रकारांना काढण्यात आले. असं का घडतयं? खर बोलणं पाप आहे का? प्रश्न उपस्थित करणं गुन्हा आहे का? सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आवाज उठवणे हा तर पत्रकारांचा अधिकार आहे. मग तरीही वृत्त वाहिनीवरील पुण्य प्रसुन जोशी, अभिसार शर्मा, निखील वागळे यांच्यासारख्या अभ्यासू पत्रकारांना चॅनेलवरुन काढण्यात का आले. जर पत्रकारांचा आवाज दाबला जातोय तर सर्वसामान्यांचं काय होत असेल? कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने देशातील लाखो लोक पाॅझिटिव्ह झालेत तर हजारो मृत्यू पावले. मात्र आपल्या माध्यमाने इथेही अमिताभ बच्चनच्या कोरोना झाल्याची बातमी एवढी रंगवली की त्यांच्या नाष्ट्यापासून तर झोपण्यापर्यंतच्या बातम्या बेकिंग लावून चालत होत्या.
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्याप्रकरणी तर मुख्य प्रवाहातील माध्यमांनी एक्टिंग कळसचं गाठलं. एखाद्या मोठ्या प्रस्थापित माध्यम समूहातील चॅनलने रिया चक्रवर्तीची स्क्रिप्टेड मुलाखत घ्यावी आणि ती किती इनोसंट आहे हे दाखवण्याचा पीआर करावा एखाद्या प्रस्थापित माध्यमाने सुशांत सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येत सस्पेक्ट असणाऱ्या व्यक्तीला मुलाखतीतून ती किती निरागस आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणे कितपत योग्य? आणि ज्या पद्धतीने पत्रकार समाजभान विसरून स्व: हिताची पत्रकारिता करायला लागतो तेव्हा हे असंच घडणार. मुळात मुख्य प्रवाहातील पत्रकारिता ही वस्तुनिष्ठ बातम्या दाखवण्यासाठी उरलीच नाहीये हे याठिकाणी अधोरेखित होतं.
मुख्य प्रवाहातील माध्यमं जेव्हा जबाबदारी झटकून नेत्यांची हुजरेगिरी आणि भांडवलशाहीकरिता पत्रकारिता करु लागतात तेव्हा काय घडतं? शेतीसंबंधीच्या बातम्या टाळल्या जातात. महिलांचे सबळीकरण होत नाही. वचितांचा आवाज दाबण्यात येतो, बेरोजगारीवर चकार शब्द काढण्यात येत नाही. अश्यावेळी समजून घ्या लोकशाहीचा चौथा स्तंभ कुठेतरी ढासळण्याच्या मार्गावर आहे. बेरोजगारी, उपासमारी, दुष्काळ असे असंख्य आव्हानं देशासमोर उभी असताना आपल्या माध्यमांकडे गेल्या दीड महिन्यांपासून सुशांत सिंग राजपूतच्या ब्रेक्रिंग पलिकडे बातमीच नसावी किती हे दुर्दैव. या सगळ्या घटनाक्रमातून एकच सिद्ध होतं आपल्या लोकशाहीचा चौथा बुरुज ढासळतोय. पत्रकारितेच मोठ्या प्रमाणात भांडवलीकरण झाल्यामुळे वस्तुनिष्ठ बातम्यांचा ओघ कमी झालाय. ख-या बातम्यांना डावलून खोट्या बातम्यांचा मुसळदार पाऊस पडायला लागलाय. ‘बातमी निष्पक्ष असणे हा जरी बातमीचा गुणधर्म असला तरी आजच्या बातम्या पक्षधार्जनी आहेत हेही तितकेच सत्य.’ जाती-धर्मात बातम्यांचा वादळही मोठ्या प्रमाणात वाहू लागलाय. मध्यंतरी तर कोरोनालाही जातीचा रंग देऊन वाट्टेल त्या बातम्यांना जन्म देण्यात आला.यातून आपली पत्रकारिता कुठल्या स्थराला जावून पोहचलीये हे लक्षात आलचं असेल. हे लोकशाहीच्या चौथ्या स्थंभ ढासळण्याची चिन्हे नाहीत का? तुम्हीच ठरवा…
– रवी चव्हाण