फि टनेस माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे आणि त्याकडे मी कधीच दुर्लक्ष करत नाही. मी रोज व्यायाम करते. सकाळी सहा ते सात अशी तासभर मी जिमला जाते. चित्रीकरणामुळे सकाळी वेळ न मिळाल्यास मी संध्याकाळी जिमला जाते. जिमला जाणं सहसा मी टाळत नाही. कामानिमित्त कधी मुंबईबाहेर जावं लागल्यास थोडा वेळ काढून मी फ्री हॅण्ड एक्सरसाइज करते. स्कॉट्स, लंजेस असे एक्सरसाइज करते. जिम आणि डाएटमुळे मी स्वतःला कायम मेंटेन ठेवते आणि त्यामुळे भूमिकेसाठी मला वजन कमी करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही.
मी सध्या ‘एक घर मंतरलेलं’ या मालिकेत पत्रकाराची भूमिका करते आहे. पत्रकार नेहमीच उत्साही आणि जोमदार काम करणारे असतात. या भूमिकेसाठी मी रोज जिम आणि डाएटकडे विशेष लक्ष दिलं. जिमसाठी वेळ नाहीच मिळाला, तर मी धावायला जाते. जिमनंतर मी सकाळच्या नाश्त्याला अंडी आणि ओट्स खाते. दुपारच्या जेवणासाठी रोजचं जेवण पोळी-भाजी आणि सलाड अधिक प्रमाणात असतं. संध्याकाळी सातच्या दरम्यान मी चिकन सूप किंवा सलाड खाते. दोन तासांचं अंतर ठेवून मी काहीतरी खात असते. मध्येच काही खावंसं वाटल्यास मी ड्राय फ्रुट्स खाते. मला माझा डाएट सोडून एखादा पदार्थ खावासा वाटल्यास मी तो नक्कीच खाते. आधी मी जंक फूड खात होते, पण सध्या मी माझ्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत असल्यानं ते टाळते. बाहेरचं खाणं मला आवडतं, पण त्याच्या प्रमाणावर मी ताबा ठेवते. आपण सगळं खाल्लं पाहिजे, पण त्यांच्या वेळा पाळायला हव्यात असं मला वाटतं.
मी दिवसातून तीन लिटर पाणी पिते. मला वाटतं; वजन जास्त किंवा कमी करायचं असलं, तरी हेल्दी राहून ते केलं पाहिजे. स्वीमिंग आणि सायकलिंग करायलाही मला आवडतं. रोजच्या कामामुळे त्यासाठी तेवढा वेळ काढता येत नाही. शरीरासाठी व्यायामाबरोबरच मानसिक तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन करणं मला गरजेचं वाटतं. एक्सरसाइजनं शरीरातून बाहेर पडणारा घाम आपल्या त्वचेला जास्त तेज देतो. सतत पाणी प्यायल्यानं त्वचा जास्त सुंदर दिसते, म्हणून त्वचा चांगली राहण्यासाठीही एक्सरसाईज करते. इंटरनेटवर बघून कोणत्याही प्रकारचं डाएट करू नका. सगळं खाऊन व्यायाम करा. माझा जिम ट्रेनर माझ्यासाठी खूप मेहनत घेत असल्यानं मी त्याची खूप आभारी आहे.