मुंबई- या वर्षीचा सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट म्हणजे ‘पुष्पा.’ चित्रपटाच्या कथेप्रमाणेच यातील सगळी गाणी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. यातील संवाद आणि गाण्यावरच्या हुक स्टेप फक्त चाहत्यांमध्येच नाही तर सेलिब्रिटींच्याही ओठांवर आहे. ‘पुष्पा’च्या ‘श्रीवल्ली’ गाण्यावर अनेक सेलिब्रिटींना रील्स बनवून इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्या आहेत. विशेष म्हणजे या यादीत क्रिकेटर्सही आहेत सुरेश रैना, डेव्हिड वॉर्नर, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजाच नाही तर आता हार्दिक पांड्या यानेही ‘पुष्पा’ सिनेमातील ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स केला आहे.
दरम्यान हार्दिकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तो श्रीवल्ली गाण्याच्या हुक स्टेपवर डान्स करताना दिसत आहे. यावेळी हार्दिक एकटाच नाही तर त्याला त्याच्या आजीचीही साथ आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की चाहत्यांसोबत अल्लू अर्जुनही स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकला नाही. हार्दिक आणि त्याच्या आजीचा डान्स पाहून अभिनेता त्याच्यावर पूर्णपणे फिदा झाला.