खरं तर तमाम भारतीय तरूणांचे आदर्श असायला हवे होते हे तीन महान युवक पण तसे कधीही झाले नाही.स्वातंत्र्य संग्रामाच्या तत्कालीन समरवेदीवर ज्यांची शरीरे लटकली,त्यांच्याच बलिदानावर आजच्या स्वतंत्र भारताची फळे आज आपण चाखतो आहोत याची पुसटशी जाणिवही आपण ठेवत नाही ही खंत आहे. या तीन महान विभूतींचा जीवनत्याग प्रखर देशभक्तीचं जिवंत प्रतिक असायला हवं परंतु शोकांतिका हिच आहे की आजही हे स्वातंत्र्यवीर जाणिवपूर्वक समाजमनापासून कोसो दूर ठेवण्याचा प्रयत्न होतो. हा इतिहासाने त्यांच्यावर केलेला अन्याय नसून जाणिवपूर्वक काही विशिष्ट विचारसरणीच्या मानसिकतेन त्यांच्या बलिदानाची केलेली क्रूर चेष्ठा आहे.
या स्वातंत्र्य सेनानींच बलिदान पुढच्या पिढ्यांना माहिती होऊ द्यायचंच नाही हा अट्टहास गेली पाच दशकं होत आलाय.त्यातही त्यांच्या पराक्रमाची तिव्रता इतकी दाहक होती की या विरोधाभासातही सर्वसामान्यांमधे कुठे न कुठे तो क्रांतीकारी विचार आणि बलिदान जिवंत ठेवण्यात राष्ट्रप्रेमी युवकांना यश आलं.आज तरूणांचे आदर्श चित्रपटाचे नट,गल्लीतला दादा, शहरातला भाई बनू लागलाय. कधीतरी वीर भगतसिंग ,सुखदेव आणि राजगुरू यांना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला असता तर अराजकतेनं बरबटलेलं भविष्य तुमच्या आमच्या पुढ्यात उभं ठाकलं नसतं.स्वातंत्र्याचा स्वैराचार हा असा बोकाळला नसता.कुणालाच याची साधी खंत ही वाटली नाही. या देशाला पुन्हा एकदा प्रखर राष्ट्रभक्तीची आवश्यकता भासेल तेंव्हा गल्लीतले दादा,भाई चित्रपटातील अभिनेते उपयोगाला येणार नाहीत हे देखिल त्रिकालबाधित सत्य आहे.चुकीचे आदर्श समाजमनापुढे देत स्वातंत्र्यानंतरच्या शासकांनी अत्यंत घोर अपराध केलाय असेच म्हणावे लागेल.वीर भगतसिंग यांचं संपुर्ण कुटुंब देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग देत आलंय. सरदार अजितसिंग हे वीर भगतसिंगाचे चुलते ज्यांनी देशात आणि देशाबाहेर राहून इंग्रजीसत्तेला हदरवून सोडले होते.जेंव्हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे मंडालेच्या तुरूंगात कैदेत होते तेंव्हा त्यांच्या बरोबर सरदार अजितसिंगही होते.त्या सहवासात टिळकांना अजितसिंगांचा सविस्तर परिचय झाला ज्यामुळे लोकमान्यांनी एक विधान ताया काळी केलं होतं की लवकरच भारत इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होईल तेंव्हा देशाची धुरा या अजितसिंगाच्या हाती देवून हा देश अत्यंत बलशाली बनेल. सरदार किशनसिंग आणि जानकीदेवी यांच्यासह यांची सर्व आपत्ये देशाच्या सेवेस उभी राहिली.त्यात त्यांच्या दोन मुलांसह मुलगी हरनाम कौर यांचा ही उल्लेख होतो.
लाहोर पासून अमृतसरपर्यंत ठिकठिकाणी या परिवाराची संपत्ती आणि स्थावर मालमत्ता होती. तत्कालिन परिस्थितीत अत्यंत तालेवार, सदन आणि श्रीमंतीची रेलचेल असणारा हा परिवार होता. स्वातंत्र्य समरात हे कुटुंब उतरलेच नसते तर आज या परिवारातील वारसदार राज्यकर्तेसुद्धा बनले असते किंवा भारतातील प्रथितयश उद्योगपती म्हणून गणले गेले असते. या सर्व सुखवस्त आयुष्याला लाथ मारून स्वातंत्र्यासाठी त्याग करणारा हा परिवार कित्येकांच्या स्मरणात राहतो.
वीर भगतसिंग पेक्षा वयाने थोडा मोठा असलेला सुखदेव हे महाविद्यालयीन जीवनात देशप्रेमाच्या अतूट धाग्याने एकमाकांना असे काही बांधले गेले की त्यांनी स्वातंत्र्यवेदीवर जाईपर्यंत कुणीही अलग करू शकले नाही. पंडीत चंद्रशेखर आज़ाद यांच्या मार्गदर्शनाखाली या तरूणांच्या चमूने क्रांतीकारी तरूणांची फळी उभी केली. यात पंडीत चंद्रशेखर आज़ादांच्या पारखी नज़रेनं हेरलेला निधड्या छातीचा एक मराठी तरूण सामील झाला ज्याचं नाव शिवराम हरि राजगुरू.या तरूणाचं भगतसिंगावर जीवापाड प्रेम होतं. जियेंगे तो साथ में और मरेंगे तो भी साथ में असं म्हणत अनेक क्रांतीकारी कारवायांना यशस्वी करणारे हे सच्चे देशभक्त लाहोरच्या तुरूंगात देशासाठी फासावर गेले. त्यांच्या फाशीला स्थगिती मिळावी यासाठी त्याकाळी देशभर आंदोलने झाली ,सह्यांच्या मोहिमा निघाल्या ,सरकारवर दबाव निर्माण करण्यात तत्कालिन भारतीय जनता यशस्वी झाली होती. व्हाईसराय निर्णय बदलाच्या प्रक्रियेपर्यंत येऊन पोहचला असे संकेतही पेपरात छापून आल्याचे म्हटले जाते. संपूर्ण भारतीयांचा आशावाद महात्मा गांधीजींच्या शिष्टाईवर अवलंबून होता पण वसाहतींचे केडर बेस व्हाईसरायच्या विरोधात गेल्याची बतावणी करत बापुजींना रित्या हातांनी माघारी पाठवले .
२४ मार्च हा फाशीचा ठरलेला दिवस असताना अचानक वेगाने सुत्र हलवली गेली .लाहोरच्या तुरूंगापुढे सरदार किशनसिंग यांच्यासह त्यांचे कुटुंबिय, सुखदेवांच्या घरातील नातेवाईक आणि राजगुरूंच्या वयस्कर आईसह हजारो देशभक्त नागरिकांचा आणि तरूणांचा जमाव तिथे गोळा झालेला होता.
कसलीही कुणकुण लागू न देता तुरूंगातील हलचालींना वेग आला होता . ट्रंकाॅल खणखणू लागले होते. तुरूंगातील इतर कैद्यांना फाशीची बातमी समजली असावी तसा तिथे बहुदा गोंधळ माजला असावा. आतुन देशभक्तीचे नारे देणार्या घोषणा वाढू लागल्या होत्या. अशातच तुरूंगातुन या तीनही वीराना फाशीला चालविले असल्याचा गलका बाहेर ऐकू येऊ लागल्याने तुरूंगाच्या भिंतीजवळ कानोसा दिलेल्या युवकांना ही आतली बातमी समजली असावी आणि त्यांनी ती बातमी तुरूंगासमोर बसलेल्या सरदार किशनसिंगांसह इतरांना ती कळविली. पण पुर्वनियोजित कटाप्रमाणे जगाच्या इतिहासात हा पहिला न्याय लढा अन्यायाने संपविण्याचा घाट घातला गेला आणि त्याची अंमलबजावणी केली गेली.अन्यायाची परिसिमा असलेली या देशभक्तांच्या फाशीचा आज काळा दिवस.
दुर्गमहर्षी प्रमोदजी मांडे अर्थात भाऊ या २३ मार्च च्या काळ्या दिवसास हुतात्मा दिन तसेच शौर्य दिन म्हणूनही संबोधत आणि दरवर्षी राष्ट्रप्रेमाची ज्योत जागविण्यासाठी वेगवेगळ्या शहरात या विचारांचा जागर घालत. या दिवशी भाऊ या थोर क्रांतीकारकांच्या कुटुंबातील व्यक्तिंना अशा कार्यक्रमास बोलवत आणि देशाप्रती या कुटुंबाच्या त्यागाबद्दल उपकृत होऊन उतरायी होण्याचा प्रयत्न करत. आज या भारतभू मध्ये स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेणार्या प्रत्येक भारतीयाच्या वतीने या तीन ही पुण्यात्म्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन……!
जय हिंद …..!
वंदे मातरम ….!!
इन्क्लाब ज़िंदाबाद …..!!!
- संतोष घुले
पिंपरी चिंचवड शहर , पुणे