अन्न हे पूर्णब्रह्म! हे आपण अनेकदा ऐकतो. कोणी काही खायला दिलं तर ‘नाही’ न म्हणण्याचे आपली संस्कृती सांगते. मात्र किती खावे आणि कधी खावे? हे मात्र आपली प्रकृती पाहून आपण ठरवायला हवे.
अनेकांना अॅसिडिटीचा त्रास जाणवतो आणि उलटी, मळमळणं या गोष्टी दैनंदिन जीवनाचा हळूहळू भाग होतात. व्यवस्थित खाऊन, तेलकट पदार्थ टाळून देखील त्रास होत असेल तर का बरं अॅसिडिटी होत असेल या विचाराने अनेकजण त्रासलेले असतात. खालील टिप्स फक्त अॅसिडिटीने त्रासलेल्यांसाठी आहेत.
1) आहाराच्या वेळा पाळा :
सातत्याने अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास आहारांच्या वेळा योग्य आहेत का? याची खात्री करून घ्यावी. कितीही कामामध्ये गुंतले असले तरी कामाच्या स्वरूपानुरूप दुपारच्या जेवणाची वेळ पाळणे आवश्यक आहे. सकाळची न्याहारी सर्वसाधारणपणे नऊ ते साडेनऊच्या दरम्यान घ्यावी. न्याहारी आणि दुपारचे जेवण यामध्ये किमान चार ते पाच तासांचे अंतर असायला हवे. हे शक्य नसेल तर न्याहारीमध्ये पोळी-भाजी खावी. दुपारचे आणि रात्रीचे जेवण यांच्या मधल्या वेळात हलक्या पदार्थाचे सेवन करावे.
2) पथ्ये पाळा
सातत्याने अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास पुढील पथ्यांचे पालन केल्यास नक्कीच फरक जाणवतो. शिळे पदार्थ, आंबट दही, लोणचे, पापड, तळलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
भाज्यांमध्ये मेथी, मेथीचे पदार्थ, मुळा आणि मुळ्याचे पदार्थ, सिमला मिरची यांचे प्रमाण कमी असावे.
हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा बारीक चिरलेली मिरची हे पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत.
3) करा घरगुती उपाय
रोज एक चमचा मोरावळा खाल्ल्याने अॅसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
आवळा पावडर आणि ज्येष्ठमध समभाग एकत्र करून अर्धा चमचा रोज सकाळ-संध्याकाळ दोन वेळा घ्यावी. त्यामुळे छातीतली जळजळ कमी होते.
डोळ्यांची आग होत असल्यास थंड दुधात कापसाचा बोळा बुडवून डोळ्यांवर ठेवल्यास बराच आराम पडतो.