आज सारं आकाश उजळलेल वाटतंय, अंधाऱ्या रात्रीही सारं जग उजेडात दिसतंय. पण हा प्रकाश कोणत्या तारे, चंद्र ग्रहाचा नाही, तर आहे तो तिला लागलेल्या ग्रहणाचा. वाटे वाटेवर, चौका-चौकावर वितळणाऱ्या त्या मेणबत्यांचा, ज्यामुळे मला श्रद्धांजली वाहली जात आहे. असाच एक दिवा तिच्या घरीहि तेवत असणार. ज्यामुळे सारं घर नव्हे तर घराचा एक कोपरा तरी उजेडात असणार. नंद-दीपासारखा तेवत राहणारा दिवा असाच काही दिवस घरात उजेड देईल आणि विझून जाईल. सारखा तमाशा ! हो, हो तमाशा ! बनवून टाकलाय तुम्ही सर्वांनी. मंदिर-मस्जिद पासून ते जाती पर्यंत आणि वर्तमान पत्रापासून ते राजकारणापर्यंत. तिचाही थरकाप उडालेला, किंकाळी उडालेली, या चिमुकल्या जिवाने विरोध करण्याची ताकद गमाऊन दिलेली. पण कोणीही तिची आरोळी ऐकली नाही शिवाय त्या नराधमांशिवाय जे तिच्यावर वारंवार भुकेल्या गिधाडा सारखे तुटून पड़त होते. काय! काय करत होते ते ? काही माहित नाही. हो पण तिचा शेवट होण्याची ते नक्कीच वाट पाहत होते आणि जोरदार प्रहार तिच्या डोक्यावर होऊन शेवटी तिची सुटका झाली. त्यासाठी त्या नराधमांचे आभार मानते. आभार ह्यासाठी कि तिची सुटका झाली. नाहीतर अजून कितीतरी या गिधाडांनी तिला टोचा मारल्या असत्या काय माहित?
तिचा न्याय तर झाला हो! हे जग सोडून… पण त्या नराधमांचा न्याय कोण करणार? मेणबत्त्या पेटवून, निषेध करून, आंदोलन करून कधी कोणाला न्याय मिळाला आहे का ! जर मिळाला असता तर आपली न्यायव्यवस्था आज तारखेवर आणि आश्वासनावर अवलंबून राहिली नसती. माणसाला पायाला लागलेली ठेच काय असते, हे तो पर्यंत कळत नाही जो पर्यंत ती ठेच स्वतःच्या पायाला लागून त्याची कळ मस्तकापर्यंत जात नाही. आज आपल्या देशात ज्यांना बलात्काराचा “ब” माहित नाही त्यांच्यावर बलात्कार होतोय. खेळायचे, बागडायचे वय त्यात हा “ब” बलात्काराचा. आज २१व्या शतकातही मुली जन्माला येताच मारल्या जातात त्याचे खरे कारण हेच असेल कि, जन्मदाता बाप हा मुलगी मोठी झाल्यावर तिच्या लग्नातल्या हुंड्या पेक्षा तिच्यावर होणाऱ्या बलात्काराला ‘घाबरत असेल. कारण ह्या समाजातील काही लोक तिला तिच्या लग्नाच्या वयापर्यंत पोहचू देणार नाही याची त्यालाही कल्पना असेल. पण आता वेळ आली आहे. चिमुकली या लाडक्या अक्षरांचा जीव प्रत्येकाच्या घरी असेल. पण वेळ आहे ती त्या जीवाला सांभाळून ठेवण्याची, तिच्या मनगटात ताकद भरण्याची अशी ताकद जी वेळोप्रसंगी समाजातील या नराधमांचा कोतला बाहेर काढणारी आणि या सर्वांबरोबर एक महत्वाचं म्हणजे त्या पुरुष प्रधान देशाला आपल्या आई-बहिणींची इज्जत करायला शिकवणारी. नाही तर कधी कोणत्या घरी हा ग्रहणाचा दिवा तेवेल हे सांगता येणार नाही आणि तुम्ही परत मेणबत्त्या पेटवाल आणि निषेध कराल पण हे कधी? तर सगळं संपल्यावर. आता तुम्हीच विचार करा अजून किती मेणबत्त्या पेटवणार आणि विझवणार.
(कोणालाही व्यक्तिगत ठेच पोहचावी म्हणून नाही तर या समाजाचे विचार बदलावे यासाठी लिहीत आहे)
लेखिका : पद्मजा भोईटे.