जन्माला आल्यापासूनचा तिरस्कार कधीतरी सहन करून बघ, नाही रोज रोज निदान एकदातरी तिच्यासारखंही जगून बघ…
7सर्वात आवडती खेळणी हसत हसत रडणाऱ्या भावाला देऊन बघ,
त्याचे अश्रू पुसण्यासाठी
स्वतः कोंडलेले अश्रु पिऊन बघ,
कधीतरी तिच्यासारखंही जगून बघ…
मासिक पाळीच्या त्या खडतर दिवसांत
न थकता
न थांबता
सगळा भार सहन करून बघ,
कधीतरी तिच्यासारखंही जगून बघ…
दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होण्यासाठी
स्वतःच घर सोडून बघ,
कधीतरी तिच्यासारखंही जगून बघ…
वंशाला दिवा देण्यासाठी
वीस हाडं एकदम मोडण्याएवढी वेदना सहन करून बघ,
पेटलाच नाही दिवा वंशाचा
तर सासरचा छळ सहन करून बघ,
दिवा नसला तरी पणतीचं स्वागत करून बघ,
पण कधीतरी तिच्यासारखंही जगून बघ…
आईने गपचुप दिलेल्या खाऊतला एक घास,
तिला प्रेमाने भरवून बघ…
पाटावर चढण्याआधी,
डोक्यावर औक्षण घेण्याआधी,
हातात राखी बांधण्याआधी,
अन कमरेला करदोडा ओवण्याआधी,
परक्या स्त्रीला बहीण मानून बघ,
कधीतरी तिच्यासारखं ही जगून बघ…
चढायचंच आहे बोहल्यावर
तर
वस्तूपेक्षा बाई
अन बाईपेक्षा बायको म्हणून
तिचा स्वीकार करून बघ,
कधीतरी तिच्यासारखंही जगून बघ…
महिन्याच्या ‘त्या’ चारपाच दिवसात,
निदान तिच्याजवळ बसून बघ…
तिचा हात हातात घेऊन,
तिला मिठीत घेऊन,
तिच्या डोक्यावरून हळुवार हात फिरवून…
‘तुझ्या हॅप्पी दिवसांत, मी आहे ना सोबत!’
अशी प्रेमाची फुंकर मारून बघ..
तुझ्या पुरुषी अहंकारातून बाहेर पडून, बी
निदान एकदा तिच्या मनात डोकावून बघ…
एक माणूस म्हणून जगून बघ
समजून तिच्या यातना
तिच्याकडे माणूस म्हणून बघ,
कधीतरी तिच्यासारखं ही जगून बघ…!
– नेहा मानव