कऱ्हाड म्हटलं की यशवंतराव चव्हाण, बारामती म्हणजे शरद पवार आणि आमचं पुसद म्हटलं की आठवण येते ती नाईक साहेबांची. पुसदचा आहे असं म्हटलं की, सगळ्यांचं पहिलं वाक्य असतं ते म्हणजे नाईक साहेबांच्या गावचा.
वसंतराव फुलसिंग नाईक. अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नाईक साहेबांचा प्रवास हा थक्क करणार आणि प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. महाराष्ट्राचं दीर्घकाळ म्हणजे तब्बल 11 वर्ष मुख्यमंत्रीपद त्यांनी सांभाळलं. ( नंतर अल्पकाळ सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं. त्यामुळे पुसद हे ऐकमेव असं गाव आहे ज्या गावाने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिलेत. )
यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातलं गहूली हे त्यांचं जन्मगाव. वसंतरावांचे आजोबा चतुरसिंग राठोड यांनी हे गाव/तांडा वसवलं. चतुरसिंग हे या तांड्याचे प्रमुख म्हणजे नायक, त्याचं नंतर नाईक झालं.
अतिशय सुसंस्कृत, विनम्र स्वभाव, रुबाबदार राहणी, शेतीवर मनापासून प्रेम असलेल्या नाईक साहेबांमुळेच ‘वर्षा’ हा बंगला मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान झाला हे फारच कमी जणांना माहित आहे.
प्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी ‘दूत पर्जन्याचा’ हे त्यांचं आत्मचरित्र लिहिलं. त्यात त्यांनी त्याबाबत रोचक माहिती दिली आहे. कर्णिक हे त्या काळी मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून काम पाहत असत.
यशवंतराव चव्हाणांच्या द्विभाषिक मंत्रिमंडळात 1956 मध्ये पहिल्यांदा नाईक साहेब हे सहकार खात्याचे मंत्री झाले. त्यावेळी त्यांच्या वाट्याला वास्तव्यासाठी ‘डग बीगन’ हे नाव असलेला बंगला आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचं वास्तव्य हे सह्याद्रीवर असे. ‘डग बीगन’ हा बैठा, मोठं आवार आणि सर्व बाजूंना दरवाजे असलेला प्रशस्त बंगला. त्याकाळी या बंगल्यात इंग्रज अधिकाऱ्यांनी बॅडमिंटन खेळण्यासाठी एक खास कोर्टही तयार केलं होतं.
7 नोव्हेंबर हा त्यांचा मुलगा अविनाशचा वाढदिवस. त्याच दिवशी 1956मध्ये नाईक कुटुंब ‘डग बीगन’मध्ये राहायला आलं. वसंतरावांचा पाऊस, पाणी, शेती, निसर्गावर भारी जीव. त्यांना ‘डग बीगन’ हे नाव फारसं रुचलं नाही. त्यामुळे त्यांनी या बंगल्याचं नामकरण केलं ‘वर्षा’.
या बंगल्याच्या आवारात त्यांनी विविध प्रकारची फळ झाडं, फुल झाडं, वेली लावल्या आणि सर्व परिसर हिरवागार केला. नंतर 5 डिसेंबर 1963ला त्यांनी मुख्यमंत्रीपदाची पहिल्यांदा शपथ घेतली. त्यानंतरही त्यांनी आणि त्यांच्या पत्नी वत्सलाबाईंनी सह्रयाद्रीवर न जाता ‘वर्षा’वरच राहणं पसंत केलं. तेव्हापासून ‘वर्षा’ हा बंगला मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान बनला. त्यानंतर तब्बल 19 वर्ष वसंतराव नाईकांचा वर्षावरच मुक्काम होता.
नाईक साहेबांमुळे ‘वर्षा’ हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं एक शक्तिकेंद्र झालं, ते अजुनही कायम आहे.
1 जुलै हा हरित क्रांतीचे प्रणेते असलेल्या वसंतराव नाईक साहेबांचा जन्मदिवस. हा दिवस ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करतात. नाईक साहेबांना विनम्र अभिवादन.
( संदर्भ – ‘दूत पर्जन्याचा’ आणि ‘हिरवी क्षितिजे’ )
अजय कौटिकवार,