आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके ओलांडली; या एवढ्या मोठ्या पर्वात भारताने विविध क्षेत्रात गगणभरारी घेतली आहे. आज आपला देश जगासमोर ताठमानाने उभा आहे. देशाने महासत्ताक होण्यासाठी झेप घेतली आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे “भारत उत्तिष्ठ होवून विश्वगुरुची भूमिका साकारेल आणि संपूर्ण विश्वाच कल्याण करेल.” डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी पाहिलेले मिशन २०-२० हे स्वप्नसुद्धा खरंच साकार होत आहे.
मात्र, सद्यस्थितिला सर्वात दाहक आणि गंभीर प्रश्न जर कुठलाही असेल, तर तो आहे गुलामगिरीचा… होय गुलामगिरीचा! मोघल, पोर्तूगीज, आणि इंग्रज यांच्या गुलामगिरीतून तर आपण मुक्त झालोत. पण आता आपण तंत्रज्ञानाचे गुलाम झालोय. एका वाक्यात सांगायचे झाले तर आजची आपली पीढी मोबाईलची गुलामी करत आहे. मान्य आहे, या एका साधनामुळे जग जणू हातातच आलाय. ज्ञानाच्या भंडारात प्रचंड वाढ होत चाललीय. पण याउलट यासाधनाचे(मोबाईल) विपरीत दुष्परिणाम सुद्धा आपण बघतच आहोत. अहो ज्या आईने जन्म दिला, ज्या वडिलांनी मोठं केल आज त्यांच्यासाठी सुद्धा आमच्याकडे वेळ नाही यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट काय असू शकते?
आधी मित्रांशी दिलखुलासपणे गप्पा व्हायच्या आता त्या होतात व्हाॅट्स अॅपवर या गप्पांत ना दिल असतो ना जिव्हाळा फक्त पोकळ संवाद. मोबाईलची गुलामगिरी खरंच घातक ठरतीयं. सेल्फीच्या नादात तर बरेचजण आपला जीव गमावून बसले आहेत. नाही त्या ठिकाणी स्वतः ला झोकून सेल्फी काढूण मृत्यूला आमंत्रण आपण देतोय असे म्हटलं तरी वावगं नाही. आत्तापर्यंत सेल्फीच्या गैरवापरामुळे शेकडो तरुणांनी आपले प्राण गमावले आहेत. ज्या पुस्तकांमुळे तुम्ही आम्ही प्रगल्भ होऊ शकतो. त्या पुस्तकांसाठी तर आता वेळच नाही कारण वाचनाला वेळ दिला तर मोबाईलची गुलामगिरी कोण करेल? हा विषय जितका साधा वाटतोय तितका साधा नाही. कारण या गुलामगिरीचे परिणाम आत्ता जरी खूप नगण्य दिसत असले तरी ह्या परिणामाला रौद्ररुप धारण करायला वेळ लागणार नाही. म्हणून गरज आहे जबाबदारी सांभाळण्याची, सृजन नागरीक होण्याची…
– रवी चव्हाण