बारावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या पहिल्याच पेपरमध्ये अनेक चुका असल्याचे एकीकडे निदर्शनास आले असताना, आता याच पेपरमध्ये शिक्षण मंडळाची बौद्धिक दिवाळखोरी उघडकीस आली आहे. मंडळाद्वारे पेपरमधील प्रश्न क्रमांक दोन ‘अ’ यातील ‘अनसिन पॅसेज’मध्ये चक्क टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचे व्हॉट्सॲपवर फिरणारे चुकीचे ‘कोट’ टाकल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या बाबत एका कार्यक्रमात त्यांनी हे ‘कोट’ माझे नसल्याचा खुलासाही केलेला आहे.
बोर्डाद्वारे शुक्रवारी सकाळी साडेदहा ते दोन वाजता दरम्यान इंग्रजीचा पेपर घेण्यात आला. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास पेपर हाती आल्यावर त्यात अनेक चुका असल्याचे दिसून आले. यामुळे विद्यार्थी गोंधळात सापडले. या चुका असतानाच आता पेपरमधील प्रश्न क्रमांक २ मधील ‘अ’ मध्ये रतन टाटा यांच्या नावाने नेहमीच फेसबुक, व्हॉट्सअप आणि ट्विटरवर फिरणारे ‘I dont believe in taking right decisions, I take Decisions and make them right’ हे ‘कोट’ बोर्डाने वापरत त्या आधारावर पॅसेज तयार केल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, प्रत्यक्षात हा ‘कोट’ माझा नाही असा खुलासा रतन टाटा यांनीच एका कार्यक्रमात केला होता. मात्र, बोर्डाने या ‘कोट’पासून अनसिन पॅसेजची सुरवात करुन व्हॉट्सअप विद्यापीठाला प्रमोट करण्याचे काम सुरू केले की काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.