हा काय प्रकार आहे ?हा प्रश्न बागप्रेमी मंडळी सोडून इतरांना पडतोच .तर काळेसोने म्हणजे स्वयंपाकघरातील निघालेले भाजीपाल्याचे टाकाऊ अवशेष या पासुन तयार होणारे खत ,कम्पोस्ट आहे .टाकाऊ मधुन टिकाऊ परंतु बागेसाठी अनमोल असे उत्तम सेंद्रिय खत होय .
आज आपण किचनवेस्ट पासून कम्पोस्ट कसे करायचे ती माहिती पाहू .ज्याप्रमाणे आपण रासायनिक खते व कीटकनाशके वापरलेला भाजीपाला खाऊ नये म्हणून आपल्या बागेत,परसबागेत भाजीपाला,फळभाज्या, फळे लावण्याचा प्रयत्न करीत आहोत त्याच प्रमाणे आपण सेंद्रिय खताचाच वापर आपल्या झाडांसाठी करायला पाहिजे व यामुळे आपणास दर्जेदार व पौष्टिक असा भाजीपाला मिळेल .त्याच प्रमाणे आपण निसर्गाच्या पर्यावरण संरक्षणाला हातभार लावू शकू .आपल्या घरातील जो कचरा आपण बाहेर कचरागाडीत नेऊन टाकतो त्यामुळे तो कुजून सडून दुर्घन्धी निर्माण होऊन अनेक रोग निर्माण होतात व हे होऊ नये यासाठी आपण जर सर्वानी आपल्या घरातील कचरा घरातच कम्पोस्ट साठी वापरला तर दोन्ही गोष्टी साध्य होतील
१)पर्यावरणचे संरक्षण.
२)उच्च प्रतीचे कम्पोस्ट.
हे सेंद्रिय खत कसे तयार करायचे याची सविस्तर माहिती मी माझ्या पद्धतीने देत आहे .सर्वच बागप्रेमी खत करतात परंतु प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी व अनुभव कमी जास्त असतात .मी काही खुप मोठे जाणकार नाही .सुरुवातीला मी खत तयार केले होते तर काहीतरी चुकले होते व त्यामुळे त्यात खुप अळ्या झाल्या होत्या व मी ते फेकुन दिले होते परंतु काही मंडळींनी मला त्यावर उपाय सांगितले होते .परंतु मी फेकल्यामुळे मला ते उपाय करता आले नाहीत .मी परत कम्पोस्ट तयार केले व यावेळी ते उत्तम झाले व गेले तीन वर्षेपासून मी सतत कम्पोस्ट करीत आहे कधीच चुका झाल्या नाहीत .चुकांमधूनच मनुष्य शिकत असतो.
खतकुंडीसाठी शक्यतो मातीची आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी चांगली भोकं असलेली कुंडी अथवा माठ,ड्रम,बकेट,वापरावी. प्लास्टिकची कुंडीपण आपण वापरू शकतो. ज्याचाही वापर करायचा आहे त्याला सर्व बाजूंनी चांगली भोके पाडून घ्यावी. मातीची कुंडी किंवा प्लास्टिकची जास्तं भोकं असलेली कुंडी घेण्यामागचे कारण म्हणजे खताच्या कुंडीत भरपूर हवा खेळणं आवश्यक आहे.
आपल्या गरजेनुसार योग्य त्या आकाराचा ड्रम अथवा जे सोईस्कर असेल अशा भांड्याची निवड करून उन लागेल परंतु पावसाचे पाणी आत जाणार नाही अशा ठिकाणी ठेवा.प्रथम नारळाच्या शेंड्या खाली जाडसर थर पसरवुन ठेवा त्यावर माती ,शेणखत या मिश्रणाचा पातळ थर द्यावा .शेणखत नसल्यास मातीचा थर द्यावा .मातीजर पिंपळ,वड अश्या वृक्षाखालील असेल तर उत्तमच कारण ठिकाणी झाडाझुड होत नाही त्यामुळे अशा मातीती कम्पोस्टला उपयोगी जिवाणूंची संख्या व गांडुळांची अंडी असण्याची शक्यता जास्त असते. शेणखत किंवा गांडूळयुक्त माती नसेल तर जी असेल त्या मातीचा पातळ थर द्यावा. साधारण दोन इंचाचा थर द्यावा.आता आपल्या रोजच्या स्वयंपाक घरातील उरलेला भाज्यांच्या उरलेल्या काड्या, पाने, देठ, शेंगांची साले ,निर्माल्य असे जे काही असेल ते सर्व थोडे बारीक कापून ड्रममध्ये टाकणे चालू करावे. यात बागेतील वाळलेला पालापाचोळा पण आपण टाकू शकतो.अशा प्रकारे ओला कचरा त्यावर वाळलेला पालापाचोळा वर्तमानपत्राचे कपटे असे टाकावे परत ओला सुका व त्यावर आपलेकडे जुने कम्पोस्ट असेल तर ते थोडे टाकावे यामुळे कचरा कुजण्याची प्रक्रिया लवकर होते .नसल्यास विरजण म्हणून गुळाचे पाणी किंवा ताक ,गोमूत्र किव्हा ज्यांच्याकडे डिकम्पोस्टअसेल तर यापैकी काहीही जे तुमच्याकडे असेल ते मध्ये मध्ये टाकावे . ३,४दिवसांनी हे मिश्रण काठीने हलवावे यामुळे ओलासुका कचरा मिक्स होऊन प्रक्रिया लवकर होते व कचरा खाली खाली बसत जातो व आपणांस नवीन कचरा टाकायला जागा होते अश्या प्रकारे करीत ड्रम,कुंडी भरली की कचरा टाकणे बंद करावे व त्याला झाकण लावुन बंद करावे.अध्येमध्ये कचरा हलवीत राहावे .पावसाळ्यात करत असाल व अश्यावेळी कचऱ्यात ओलावा जास्त दिसत असेल किव्हा अळ्या दिसत असेल तर त्यात वाळलेला पालापाचोळा घालावा किंव्हा वर्तमानपत्र कापून त्यात मिक्स करावे.या अळ्याच कम्पोस्ट करण्याचे काम करतात परंतु अतीच दिसत असेल तर त्यावर हळद किंवा हिंग घालावा त्यामुळे त्या कमी होतात .
कम्पोस्ट तयार होण्यास जवळपास तीन महिन्यांच्या कालावधी लागतोच तोवर आपल्या घरातील निघणारे किचनवेस्ट चा याच तर्हेने दुसरा ड्रम कुंडी भरावी .तीन महिन्या नंतर पाहिले असता मातीसारखा थर झालेला दिसून येतो .हातात घेतल्यावर जर भुरभुरीत जाणवले तर आपले कम्पोस्ट तयार झाले समजावे .पहिला पाऊस पडल्यावर जसा मातीचा सुगंध येतो त्याप्रमाणे याला तसाच सुगंध येतो. खत काढायच्या वेळी, प्रथम वरचे न कुजलेले पदार्थ बाहेर काढावेत. एक थर काढल्यावर जरा थांबावे म्हणजे तिथल्या जीवाणूंना खाली जायला वेळ मिळेल. नंतर पुढचा थर काढावा. न कुजलेले पदार्थ संपल्यावर, काळ्या रंगाचा थर दिसेल. हा थर म्हणजे कुजून तयार झालेल्या मातीचा अर्थात कंपोस्टचा. सगळ्यात खालच्या थरात भरपूर जीवाणू व गांडुळे असतील . हा थर तसाच ठेवावा . आणि सुरुवातीला बाहेर काढलेले न कुजलेले पदार्थ परत कुंडीत घालावे. हे काढलेले खत जर खुपच जाडसर वाटत असेल तर चाळणीने चाळून घेऊन त्याला एक,दोन दिवस उन्हात ठेऊन नंतर प्लॉस्टिक पिशवीत किंव्हा डब्यात भरून कोरड्या जागेवर ठेवावे व आपल्या झाडा नुसार खत झाडाला घालावे यामुळे आवश्यक घटक रोपांना मिळतात व त्याची वाढ फुलफळे यावर चांगला परिणाम दिसुन येतो. घरी तयार केलेल्या कंपोस्टचा आनंद नक्कीच घेऊन बघा .आपण केलेल्या खताचा एक वेगळाच आनंद मिळतो.व कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावून पर्यावरण संतुलन राखल्याचा आनंद मिळेल.
कांचन चिपाटे, नागपूर.