मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील झालेला गोंधळ व निकाल जाहीर होण्यास होणारा विलंब या संदर्भात ‘अभाविप’ च्या प्रतिनिधी मंडळाने आज राजभवनात जावून राज्यपाल यांची भेट घेतली व या संबंधी उच्च स्तरीय समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ च्या परीक्षा में महिन्यात संपन्न झाल्या, परंतु या ऑनलाईन प्रक्रियेच्या गोंधळामुळे ७० दिवस उलटूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळाले नाहीत. यासंबंधी राज्यपालांनी आदेश दिल्यानंतर कुलगुरूंनी ३१ जुलै पर्यंत निकाल घोषित करण्याची हमी दिली असली तरी परीक्षा विभागातील सुरु असलेला गोंधळ लक्षात घेता ३१ जुलै पर्यंत निकाल लागणार का ? असा प्रश्न अभाविप प्रदेश मंत्री प्रमोद कराड यांनी उपस्थित केला आहे. या संबंधीत कंपनीची विश्वासार्हता देखील तपासली पाहिजे असे मत मुंबई महानगरमंत्री रोहित चांदोडे यांनी व्यक्त केले. निकालाच्या या सर्व गोंधळामुळे सामान्य विद्यार्थ्याच्या मनस्तापाला विद्यापीठाचे कुलगुरू व संबंधित अधिकारी दोषी आहेत असे मत अभाविपने व्यक्त केले व या सर्व प्रकाराची उच्च स्तरीय समिती मार्फत चौकशी करण्यात यावी व दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अभाविपने यावेळी केली व यासंबंधी राज्यपाल यांना निवेदनही देण्यात आले.
अभाविप च्या मागण्या :-
१. मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन उत्तर पत्रिका तपासणीच्या कंपनी निश्चिती करणाच्या निवडप्रक्रियेमध्ये सहभागी सर्व विद्यापीठ अधिकारी व विद्यापीठ बाहेरील व्यक्तिंची सखोल चौकशी करण्यात यावी.
२. संबंधित कंपनीची विश्वासार्हता तपासून कंपनीच्या वतीने मुंबई विद्यापीठाला दिलेल्या कार्यपूर्ततेची माहिती सर्वांसमोर घोषित करावी.
३. परीक्षा विभागातील बदली झालेले कर्मचारी अजूनही परीक्षा विभागात ठाण मांडून बसले आहेत. अश्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
निकाल लागण्यास उशीर होत असल्यामुळे विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला असल्याची खंत मा. राज्यपालांनी व्यक्त केली व वरील मागण्यांसंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केली जाईल व दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन मा. राज्यपालांनी अभाविपच्या प्रतिनिधी मंडळास दिले.