मुंबई : मुलुंडमधील म्हाडा कॉलनी सार्वजनिक गणेश मंडळाने यंदा ऑलिम्पिकचे चलचित्र साकारले आहे. या चलचित्रात ऑलम्पिकमध्ये चमकदार खेळ करुन पदक मिळवलेल्या खेळाडूंची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ खेळाडूंची माहितीच नाही, तर खेळांमध्ये सहभागी होऊन शानदार कारकीर्द करण्याचा संदेशही तरुणांना या चलचित्रातून देण्यात आला आहे.
सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, दोन ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांच्यासह अनेक खेळाडूंची माहिती या चलचित्रात देण्यात आली आहे. या चलचित्रातून महाराष्ट्रातील तरुणांना आणि शालेय विद्यार्थ्यांना एक मोलाचा संदेशही या मंडळाने दिला आहे. उत्तर भारतातील काही राज्यांची लोकसंख्या कमी असूनही तेथील अनेक खेळाडू ऑलम्पिकमध्ये छाप पाडतात. मात्र, त्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील लोकसंख्या जास्त असूनही येथील खेळाडू ऑलिम्पिक स्तरावर मोठ्या प्रमाणात चमकताना दिसत नाही. का?, तर महाराष्ट्रातील तरुणांमध्ये राजकीय नेत्यांचा कार्यकर्ता बनण्यात चढाओढ लागलेली असते. हीच मेहनत तरुणांनी मैदानावर घेतली, तर आगामी ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही मराठी चेहरे तिरंगा फडकावताना दिसतील, असा संदेश या चलचित्रातून देण्यात आला आहे.
दरम्यान, म्हाडा कॉलनी सार्वजनिक गणेश मंडळातील तरुणांच्या संकल्पनेतून आणि मेहनतीने साकारलेले हे चलचित्र सध्या आकर्षणाचे केंद्र ठरले असून विभागातील अनेक रहिवाशी हे चलचित्र पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.