पोकळी
लूट झाली होती एकदा कोवळ्या मनाची अश्रूच गेले चोरीला तिथे काय कथा भावनांची शब्दही नव्हते कारण साथच नव्हती विचारांची बाळ होती ती आणि भूक होती प्रेमाची
हपापलेलं मन फक्त तुमचे स्पर्श मागत होतं कितीदा समजावलं तरी चार गोड शब्दांसाठी भांडत होतंहव्या असलेल्या जगासाठी मग कल्पनेत रमत होतं अपेक्षा करायच्याच नसतात, हेच जणू त्याला कळत नव्हतं
एक दिवस अचानक पुस्तकाशी दोस्ती झाली भिरभिरणाऱ्या अक्षरांतून विचारांना स्थिरता आली शब्दांच्या माध्यमातून दिवास्वप्न पाहू लागली गरज नावाची गम्मत आता तिची तिलाच उमजून आली
फाटक्या भावना शब्दांनी सजवून ती तिचा तिलाच धीर देते सुकला अश्रू शाईत भिजवून एक नवी कविता लिहिते फेसबुकच्या जगात ब्लॉगमधनं ओरडून ती तीच घर शोधते काळपटल्या ओठांवर, डागाळलं हसून, मूक आक्रोश करते
भरकटल्या स्वप्नांना आज दिशा मिळालीये वेगळी घुस्मटल्या एका शोधाला वाट गावसलीये मोकळी प्रेम दुसऱ्यांवर करण्यासाठीच असतं, गोष्टच संपली इथे सगळी एवढीशीच होती माहितीच नव्हतं,आज प्रकाशली तिची पोकळी
– मृगा वर्तक