गेल्या २ महिन्यांपेक्षा जास्त काळापासून माझे शेतकरी माय-बाप दिल्लीच्या वेशीवर आपल्या हक्कांची लढाई लढतायत. त्यांच्या हक्कांसाठीचं हे आंदोलन चिरडण्याचा जमेल तो प्रयत्न मोदी-शाहांची जोडगोळी करतेय. पण त्यांना हे कदाचित हे ठाऊक नाही, की अन्याय अत्याचारांची परिसीमा गाठली की जनतेच्या संतापाचा उद्रेक होतो तेव्हा जनता उठाव करते आणि सत्तेच्या गर्वाने खुर्चीवर बसलेल्या सत्ताधाऱ्यांना हादरा बसतो.
मोदी-शाहांची जोडी वारंवार सत्तेचा गैरवापर करून देशभरातील अनेकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण शेतकरी आंदोलनाची धग आता जगभरात पोहोचलीये आणि मोदी-शाहांच्या ‘अच्छे दिन’चा मुखवटा टराटरा फाटत चाललाय. आणि मोदी सरकारच्या हुकूमशाली हादरा दिला आहे तो महिला शक्तीने….आंतराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाकडे लक्ष वेधणारं एक ट्विट काय केलं, मोदी सरकारचं परराष्ट्र मंत्रालय खडबडून जागं झालं.
देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला महत्व न देणाऱ्या या जुलमी सरकारला रिहानाच्या ट्विटनं जागं केलं. रिहानानंतर, मिया खलिफा, ग्रेटा थनबर्ग, अमांडा क्रेनी आणि मीना हॅरिस या महिला शक्तीनं जागतिक पातळीवर माझ्या शेतकरी माय-बापाच्या हक्कांची लढाई अधोरेखीत केली. ३२ वर्षांचा रेहाना असेल किंवा केवळ १८ वर्षांची ग्रेटा असेल…..शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी या जागतिक पातळीवरील महिलांनी देशांच्या सीमा ओलांडत माणुसकीला कोणतीही सीमा नसते हे दाखवून दिले.
जेव्हा स्त्री शक्ती मैदानात उतरते तेव्हा मोठ्या मोठ्यांना त्यांच्या तलवारी म्यान कराव्या लागतात. माझ्या शेतकरी माय-बापाच्यामागे खंबीरपणे उभं राहून रिहाना, मिया खलिफा, ग्रेटा थनबर्ग, अमांडा क्रेनी आणि मीना हॅरिस या नारी शक्तीनं शेतकरी आंदोलनाला बळ दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद द्यावेसे वाटतात. आणि शेतकरी आंदोलनाला जागतिक पातळीवर नेऊन रिहानानं मोदी-शाहांचा खरा चेहेरा जगासमोर आणल्या बद्दल तिचं विशेष कोतुक करावंसं वाटतं. हा संघर्ष संपत नाही, तो पर्यंत मी ही माय-बाप, शेतकऱ्यांच्या सोबत आहे…
अॅड.यशोमती ठाकूर
(लेखिका राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आहेत)