राखेतून उठून फिनिक्सप्रमाणे भरारी घेणारा आनंद बनसोडे म्हणजे खऱ्या आयुष्यातील ‘बाजीगर’

आयुष्यात येणा-या अनेक अडचणी आणि संकटांवर स्वार होऊन हृदयात जपलेल्या आपल्या स्वप्नांचा वेड्यासारखा पाठलाग करणारा एक ध्येय वेडा तरूण आनंद बनसोडे.

“जिंदगी की यही रीत है!
हार के बाद ही जीत है!”

मि. इंडिया या चित्रपटातील किशोर कुमारजींनी गायलेलं हे गाणं माझ्या डोळ्यांसमोर सहज तरळून गेलं, जेव्हा सोलापूरातील तरूण गिर्यारोहक, लेखक आणि प्रेरणादायी वक्ता आनंद बनसोडे याचा गेल्या काही वर्षातील प्रवास पाहिला. आपल्या आयुष्यात आलेल्या संकटांसमोर अनेकजण हातपाय गाळून बसतात, अगणित अश्रू ढाळतात आणि संकटांसमोर हार मानतात. परंतू सोलापूरचा हा तरूण त्याच्या आयुष्यात आलेल्या सर्व संकटांना पुरून उरला आहे. शाहरूख खान चित्रपटात जसा बाजीगर आहे, तसाच हा तरूण त्याच्या ख-या खु-या आयुष्यात ‘बाजीगर’ आहे.  लहानपणी गरिबीचे चटके सोसत, अंधा-या झोपडीत वास्तव्य करत हा आनंद अनेक स्वप्ने पहात होता. नुसती स्वप्नेच पहात नव्हता, तर ती स्वप्ने आपल्या हृदयात कोरत होता. सोबत बोलण्याच्या दोषामुळे असलेला न्यूनगंड. शारीरिक न्यूनगंडात एक स्वप्न त्याने आपल्या हृदयात कोरलं होतं, जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं. गरिबीचे चटके सहन करत, आपल्या गरीब आई- बापाच्या डोळ्यांत पहात आणि दूरर्दम्य ईच्छा शक्तीच्या जोरावर आनंदने एव्हरेस्ट सर केलं आणि एव्हरेस्ट सर करणा-या काही मोजक्याच लोकांच्या पंक्तीत जाऊन बसला. त्याचवेळेस ख-या अर्थाने सोलापूरचा आनंद बनसोडे हा तरूण आणि त्याचा संघर्ष जगाला समजला. इथून पुढे आनंदचे आयुष्य सुखदायक झाले अशीच तुम्ही कल्पना केली ना?

 पण म्हणतात ना! आयुष्य हे आपल्या म्हणण्या प्रमाणे चालत नसतं. आपल्या आयुष्यात काही गोष्टी या विधीलिखीत असतात. काहीही झालं तरी आपल्याला त्या सर्व गोष्टी टाळता येत नाहीत. अशीच एक दुःखद घटना २०१५ साली आनंदच्या आयुष्यात घडली. आनंद अमेरिकेतील अलास्का येथे एका मोहिमेवर असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. मोहीम अर्धवट सोडून तो भारतात आला. ज्या व्यक्तीने रस्त्यावर गाड्यांची चाक आउट व पंचर काढून मुलाला सर्वोच्च स्वप्ने दाखवून दिले तो व्यक्तीच आता या जगात नव्हता. आपली स्वप्ने जिद्दीने पूर्ण करणा-या या तरूणावर नियतीने घाव घातला. त्या घटनेमुळे आनंद पुरता उन्मळून पडला. त्यानंतर लगेचच आनंदला मनक्याचा आजार झाला आणि प्रचंड उत्साही, सर्वांचा लाडका आणि आदर्श असलेला हा तरूण अंथरूणाला खिळून पडला. डोळ्यांत प्रचंड स्वप्ने होती, मनात प्रचंड ईच्छा होत्या, आपली स्वप्ने पूर्ण होतील की नाही, याची त्याला भिती आणि काळजी वाटत होती. माणसाच्या आयुष्यात जेव्हा असं एखाद संकट येतं तेव्हा माणसाला कोणाच्या तरी साथीची प्रचंड गरज भासते. त्याला असं वाटतं की, कोणीतरी आपल्या खांद्यावर हात ठेऊन आपल्याला म्हणेल की, काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. आनंदला सुद्धा त्यावेळेस अगदी असचं वाटत होतं आणि त्याचं ते वाटणं ‘अक्षया’ म्हणजे आनंदच्या प्रेयसीने भरून काढलं. आनंदच्या आजारपणात तिने त्याला फक्त साथ दिली नाही, तर तिने त्याची सुश्रूशा देखील केली, त्याला भावनिक आधार दिला आणि आपल्या स्वप्नांच्या मागे पुन्हा एकदा धावण्यासाठी प्रवृत्त केलं. वडिलांच्या जाण्याने आनंदची आईही खचून गेली होती. पूर्ण कुटुंबच निराशमय झाले होते. अश्या सर्वस्व गमावलेल्या व मणक्याच्या आजाराने अंथरुणाला खिळलेला ‘आनंद’ सोबत  जीवनसाथी म्हणून प्रवास सुरु करण्याचा धाडसी निर्णय ‘अक्षया’ ने घेतला. २६ जानेवारी २०१६ साली अनाथ मुलांच्या आश्रमात कोणत्याही कार्यक्रमाशिवाय भारताचे संविधान वाचून आनंद व अक्षया यांनी लग्न केले. तेव्हा ख-या अर्थाने अक्षया ही अक्षया आनंद बनसोडे झाली. 

आनंद जेव्हा अंथरूणाला खिळला होता, ‘तेव्हा एव्हरेस्टवीर अंथरूणाला खिळला’,  ‘आनंद बनसोडे आता चालू देखील शकणार नाही’,  ‘जगातील चार खंडातील सर्वोच्च शिखरे सर केलेल्या एव्हरेस्टवीरासाठी मदतीचा हात द्या’ अशा अनेक बातम्यानी पूर्ण महाराष्ट्र व देश हळहळला. परंतू आनंद सारखा स्वप्नावादी खेळाडूची परीक्षा रिअल लाईफ मध्ये होती. पुन्हा उठून नियतीवर वार करणार नाही तो “आनंद बनसोडे” कसा. २०१७ नंतर आपल्या स्वप्नांचा पुन्हा एकदा ध्येयाने पाठलाग करण्यासाठी आनंद सज्ज झाला होता. आर्थिक संकटात असताना प्रचंड संकटे झेलून निधड्या छातीने २०१७ साली आनंदने आपल्या व्यवसायाची सुरवात केली. साहसी खेळ आयोजित करणा-या ‘360 एक्सप्लोरर’ या कंपनीची सुरवात केली आणि अनेकांना गिर्यारोहणासाठी प्रोत्साहीत केले. त्याच्या या कंपनीने आफ्रिका, युरोप, नेपाळ आणि महाराष्ट्रात अनेक मोहिमा यशस्वी रित्या पार केल्या. या सर्व मोहिमांमुळे आनंद पुन्हा एकदा जगभर पोहोचला. मणक्याच्या आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर सुद्धा आनंदला अनेक भितीदायक स्वप्ने पडायची, त्याला सारखं असं वाटायचं की, “मी अजूनही अपंग आहे, अजूनही माझा मनका तुटलेला आहे”. या सर्व भितीवर मात करण्यासाठी 2020 मध्ये लाॅकडाऊनचा फायदा घेत आनंदने ध्यान, व्यायाम आणि विपशयना याच्या आधारे दमदार पुनरागमन केले आणि अखेर 17 ऑगस्ट 2021 रोजी त्याने माउंट एलब्रूस हे शिखर युरोपातील सर्वोच्च शिखर दुस-यांदा सर केले आणि त्यातून लोकांना त्यांचा पूर्वीचा आनंद पुन्हा मिळाला. फिनिक्स प्रमाणे उठून प्रचंड ईच्छा शक्तीच्या जोरावर आनंदने युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रूस दुस-या वेळेस सर केले आणि ते शिखर दुस-यांदा सर करणारा आनंद हा महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती झाला. आजमितीला गिर्यारोहक आनंद बनसोडे याच्याही पलिकडे त्याने अनेक क्षेत्रात स्वतःची वेगळी अशी ओळख बनविली आहे.  एकेकाळी बोलण्यात दोष असलेला आनंद आता प्रेरणादायी वक्ता बनला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयात ११० देशांसमोर आनंदने भाषण सुद्धा केले आहे. कधी काळी ९ वी नापास असलेल्या आनंदच्या आयुष्यावर आज इ. ९ वीत हिंदी विषयात एक धडा समाविष्ट केला आहे. व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यात देखील त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गिर्यारोहक आनंद बनसोडे सध्या लेखक असून त्याची आजमितीस सुमारे पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सध्या पुणे विद्यापीठाच्या फिजिक्स  डिपार्टमेंटमध्ये फिजिक्ससारख्या विषयात आनंद PhD ही करत आहे. युनायटेड नेशन्सच्या Goodwill Ambassador असलेल्या फरहान अखतरने देखील आनंदची पाठ थोपटली आहे. ४ खंडातील ४ सर्वोच्च शिखरावर राष्ट्रगीत वाजवणारा गिर्यारोहक म्हणून याला लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आनंदच्या विक्रमांची नोंदही आहे.वडिलांच्या मृत्यूनंतर आलेल्या शारीरिक आजारपणावर, बोलण्यात असलेल्या दोषावर, ‘ढ’ पणावर, गरिबीवर मात करून आयुष्यात येणा-या संकटांशी दोन हात करणारा आनंद आज प्रत्येकाचा आदर्श बनला आहे. त्याचा हा प्रवास आपल्याला फक्त प्रेरणाच देत नाही, तर शिकवण सुद्धा देतो. कारण पुन्हा एकदा आपल्या किशोरदांनी म्हणलेलच आहे.

“आने वाला पल जाने वाला हे!
हो सके तो इसमें जिंदगी बिता दू,
पल ये भी जाने वाला है.”

आनंदाच्या आयुष्यातून आपल्याला हेच शिकायचं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.