आज सोशल मिडियावर जितके लोक मला ओळखतात, त्यातला सर्वात जास्त टक्का हा मनसे आणि राजसाहेब ठाकरे या दोन गोष्टींमुळे ओळखणाऱ्यांचा आहे. सध्या मी पक्षाचं काम करत नाही. मी माझं मत तटस्थ ठेवलंय. पक्षातल्या आणि साहेबांच्या काही गोष्टी पटल्या नाहीत. पण साहेबांवरचं आणि पक्षावरचं प्रेम कमी झालं नाही.
राजसाहेबांमध्ये एक चुंबकीय आकर्षण आहे. तुम्ही त्यांच्यापासून कितीही दूर पळण्याचा प्रयत्न करा, पण तुम्ही त्यांच्यापासून, त्यांच्या विचारांपासून दूर राहू शकत नाही. पक्षासाठी लिहीणं आणि आंदोलनात भाग घेणं थांबवल्यानंतरही अनेकदा मी माझं राजकीय मत तटस्थ ठेवण्याचा प्रयत्न केला. करतोय. पण परिस्थिती अनुरूप राजसाहेबांचे विचार अनेक प्रसंगाना लागू पडताना दिसतात.
आपल्या आजू-बाजूला घडणाऱ्या अनेक घटनांवर राजसाहेबांचं एक वेगळं मत असतं. त्यांच्या अनेक भूमिका या राजकीय प्रवाहाच्या विरोधातल्या आणि सामाजाच्या हिताच्या असतात. अनेकदा त्यांच्या जुन्या भाषणातले काही संदर्भ सद्य परिस्थितीला तंतोतंत लागू पडताना दिसतात.
सौंदर्यातून उज्वल भविष्य साकारण्याचं विजन त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर भविष्यातील धोक्यांची शक्यता वर्तवण्याचा दूरगामी विचार देखील त्यांच्याकडे आहे. साहेबांनी आज ५३ व्या वर्षात पदार्पण केलंय. पण तरीही त्यांचं विजन त्यांचा तडफदारपणा आजही असंख्य तरूणांना प्रेरित करतो.
मनसेचं भविष्य काय असेल हे सांगणं कठीण. पण महाराष्ट्राच्या राजकारणात जोपर्यंत राज ठाकरे नावाचा नेता बुरूजा सारखा आहे, तोपर्यंत महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत कोणात होणार नाही येवढं मात्र नक्की.
– सुशांत वाघमारे,
(लेखक प्लॅनेट मराठी’वर सोशल मीडिया मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.)