#वट पौर्णिमा

ज्येष्ठ महिन्यात येणा-या पौर्णिमेला आपल्या हिंदू संस्कृतीनुसार महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. आपले पूर्वज अतिशय हुशार व शास्त्रीय आधारावर काम करणारे होते. आपल्या वेदांचा अभ्यास केल्यास अनेक गोष्टी आपणांस कळतील. आपल्या देशात झालेल्या वेगवेगळ्या परकियांच्या आक्रमणात आपले अमुल्य, अतुल्य ज्ञान नष्ट करण्यात आले.

  आपले प्रत्येक सण निसर्गाशी, ऋतुमानाशी निगडित आहेत. आपल्या पर्यंत त्याचे महत्त्व न पोहोचता, रिती रिवाज, कर्मकांड म्हणून आपण सणवार करीत आलो. आपण सारे सुशिक्षितपणे डोळसपणे यांचा विचार करुया का?

मला असलेल्या वाचनाच्या आवडीमुळे मिळेल ते वाचायची सवय जडली. आमच्या घरासमोरील वडाच्या झाडावर होणारे अत्याचार पाहून आठवण आली ती गेल्या वर्षी वाचनात आलेल्या वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक यांच्या एका लेखाची. त्या लेखात वडाच्या झाडाचे अनेक आयुर्वेदिक उपयोग नमुद केले होते.

आयुर्वेदात वर्णन केलेले वडाचे औषधी उपयोग सर्वांनीच वटपौर्णिमेच्या निमित्ताने माहिती करून घ्यायला हवेत. वडाचा औषधी गुण प्रसिद्ध आहे. वडात असलेला तुरट रस म्हणजे संस्कृतमध्ये याला कषाय असे म्हणतात ह्या तुरट चवीमुळे अनेक प्रकारचे औषधी गुण या वडामध्ये असतात.

शरीरातील तीन दोषां पैकी कफ आणि पित्त या दोन दोषांचे शमन या वडाचा वापर करून करता येते. वडाचा तुरट रस आणि थंड गुणधर्मांमुळे स्त्रियांच्या मासिक पाळीच्या विकारांमध्ये उपचारासाठी वडापासून तयार केलेल्या औषधीचा उपयोग करतात. अर्थातच त्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्‍यक ठरतो.

वडाच्या खोडाची साल, पाने, अंकुर, मुळे, चीक अशा प्रत्येकाचा वापर करून वेगवेगळ्या व्याधींवर उपयुक्त औषधी तयार होते. वडाची पाने व चिक विविध प्रकारच्या संधीवातावर,  आमवातामध्ये उपयुक्त ठरतात. तसेच चीक जखमा भरून काढण्यासाठी, दातातील वेदना थांबविण्यासाठी वापरतात.  

स्त्रियांमध्ये केस गळतात यावर वडाच्या पारंब्यांनी सिद्ध केलेले तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल केसांना वरून लावण्यासाठी वापरतात. वडाच्या अंकुराचा उपयोग हा गर्भाच्या निरोगी आणि उत्तम वाढीसाठी केला जातो.

   वडाच्या पानांच्या जेवणासाठी पत्रावळी करतात. वडाची मुळे, पाने, फुले, चीक व साल या सर्वाचा औषध म्हणून उपयोग होतो. स्त्रियांच्या अनेक विकारांमध्ये हे उपयुक्त असलेले हे वडाचे झाड नक्कीच पूजनीय आहे हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे.

  वडाचे औषधी उपयोग माहिती करून घ्यायला हवेत. वटपौर्णिमेच्या निमित्ताने याचे महत्त्व आपण समजून घेऊन नित्यनेमाने दैनंदिन जीवनात आपण या वडाचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि *त्याचे संरक्षण आणि संवर्धन* केले पाहिजे. 

हा सर्व विचार करून त्या झाडाचे ऋण फेडण्यासाठी, त्याचे आभार मानले जावेत म्हणून वटपौर्णिमा साजरी करण्यात येत असावी.

चला तर सखींनो !!!वटपौर्णिमेचे नवीन व्रत यावर्षी पासून स्विकारुया… एकतरी वडाचे झाड लावूया, शक्य नसेल तर कोणतेही एक झाड लावूया व त्यांचे मनापासून संवर्धन करुया.

लेखिका – सुप्रिया निकम.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.