नागपूर | विदर्भ, मराठवाडा तसेच राज्यातील अन्य भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न याची सोडवणूक करण्यास हिवाळी अधिवेशनासाठी राज्य शासन सज्ज आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत साधारण ४१ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १९ हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली असून शेवटच्या पात्र शेतकऱ्यास कर्जामाफीचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवली जाईल.
बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना तीन पद्धतीने नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना देखील नुकसानभरपाई दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्य मंत्रीमंडळातील सदस्य उपस्थित होते.