वृक्षात वासुदेव निरखण्याची दृष्टी देणारा स्वाध्याय

आज १२ जुलै, आजच्या दिवशी परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) प्रवर्तित स्वाध्याय परिवार ‘वृक्ष मंदिर दिन’, ‘माधव-वृंद दिन’ व ‘युवा दिन’ ही उत्सव त्रिवेणी साजरी करतो. 

निसर्गाकडे, सृष्टीकडे केवळ फायदा, उपभोग अथवा उपयोग या स्वार्थी दृष्टीने न पाहाता ‘उपासना’ या दृष्टीने पाहिले पाहिजे हे सांगून वृक्षात वासुदेव पाहण्याची मंगल दृष्टी दादांनी दिली. याच भावनेतून वृक्ष लावून, त्यांचे पुजारी म्हणून दादांच्या वृक्षमंदिरांत संवर्धन केले जाते. वृक्ष मंदिर ही दादांची एक अद्भुत संकल्पना. आज निसर्ग किंवा वृक्षसंवर्धन या क्षेत्रात अनेक लोक चांगले काम करतात परंतु बहुतांश ठिकाणी केवळ उपयोग किंवा उपभोग याकरताच वृक्षसंवर्धनाच्या चर्चा होतात, तसंच आणि तेवढंच शिकवलं जातं. वृक्ष मला काही ऑक्सिजन सारख्या उपयोगी गोष्टी देतीलच, पाऊस पडायला मदतरूप पण होतीलच पण एवढाच फायदावादी स्वार्थी दृष्टिकोन ठेवणारा माणूस सुधारलेला व विकसित म्हणायचा का, हा प्रश्न आहे. विकसित म्हणवणाऱ्या मानवाने सृष्टीकडे याही पेक्षा वर जाऊन भगवद्स्वरूप म्हणून, त्यातले दैवी तत्त्व बघितले पाहिजे की नाही? आज याच पवित्र भावनेतून शेकडो एकर जमिनीवर विस्तारलेली २७ वृक्षमंदिरे सध्या भारतात उभी आहेत, ज्यातील तीन महाराष्ट्रात मालेगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात आहेत. आसपासच्या वीस गावातील स्वाध्यायी आपली पूजा समजून या वृक्षमंदिरांत निश्चित केलेल्या दिवशी येतात व उपासना म्हणून वृक्षांचे संवर्धन करतात. 

अशाच पवित्र भावनेतून लाखो स्वाध्यायी १२ जुलै या दिवशी एका बालतरूचे आपल्या घरी रोपण करतात व रोज मंत्रपठणासह जलाभिषेक करून त्याचे संवर्धन करतात. हा शिरस्ता १९९२ पासून म्हणजे गेली ३० वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. या प्रयोगाला दादांनी नाव दिले ‘माधव-वृंद’. गेल्या पाच-सहा वर्षांत जवळपास २७ लाख झाडं या प्रयोगाच्या माध्यमातून स्वाध्याय परिवाराने घरोघरीं लावली. इतकेच नाही तर गेल्यावर्षी देशभरातील हजारों स्वाध्यायींनी साधारण ३ लाख रोपं आपल्या स्नेही, मित्र, नातेवाईक यांना या १२ जुलै च्या उत्सवानिमित्त भेट म्हणून दिली. यावर्षी सुद्धा अशीच लाखो रोपं लावली जातील. आपल्याला हल्ली समाजमाध्यमांतून वड व पिंपळ लावल्याने किती फायदा होतो याबद्दलचे मेसेजेस खूपदा वाचायला मिळतात परंतु स्वाध्याय परिवार गेली जवळपास सहा सात वर्षे कुठलाही भौतिक फायदावादी हेतू न ठेवता या अशा वटवृक्षांचे केवळ रोपणच नाही तर संवर्धन पण करीत आहे. स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने गेल्या पाच वर्षांत वड आणि पिंपळ मिळून जवळपास ४०,००० वृक्षांचे आणि गतवर्षी म्हणजे म्हणजे १२ जुलै २०२१ रोजी बिल्व (बेल) आणि कडुनिंब मिळून २०,००० वृक्षांचे रोपण स्वाध्याय परिवाराने केले. अर्थात केवळ भगवंत व निसर्ग यांची कृतज्ञता म्हणूनच हे सर्व प्रयोग होत असल्याने, त्याची कुठे प्रसिद्धी अथवा जाहिरातबाजी केली जात नाही.  

ज्यांच्या मार्गदर्शनाने हे सर्व प्रयोग व स्वाध्याय परिवाराचे कार्य अव्याहतपणे चालू आहे त्या स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख श्रीमती धनश्री श्रीनिवास तळवलकर (दीदी) यांचाही १२ जुलै हा जन्मदिवस. स्वाध्याय परिवार या दिवशी दीदींचा जन्मदिवसही तितक्याच उत्साहाने साजरा करतो. दादांच्या देशविदेशातील जवळपास २५ हजार युवा केंद्रांतील युवक-युवती ज्यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली सतत रचनात्मक काम करत आहेत, त्या दीदींचा जन्मदिवस ‘युवा दिन’ म्हणूनही सार्थ साजरा करतात. निसर्गाकडे बघण्याचा एक भद्र दृष्टिकोन देणारे महान तत्त्वचिंतक पद्मविभूषण  पांडुरंगशास्त्री आठवले तसेच लाखो युवकांना एक विशिष्ट दिशा देऊन युवाशक्तीला विधायकतेकडे वळवणाऱ्या दीदींना आजच्या दिवशी वंदन !

– आमोद दातार 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.