स्वाध्याय परिवाराच्या लाखो तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागातून पथनाट्याद्वारे साजरी होणार जन्माष्टमी

वैश्विक स्वाध्याय कार्याचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (पूजनीय दादा) यांच्या प्रेरणेने स्वाध्याय परिवारातील युवा वर्ग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करतो. भगवान श्रीकृष्णाची जयंती केवळ दहीहंडी फोडून न करता त्याचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे या करता दादांनी युवकांना पथनाट्याची संकल्पना दिली. दादांची सुपुत्री व स्वाध्यायाची धुरा सांभाळणाऱ्या श्रीमती धनश्री श्रीनिवास तळवलकर (दीदी) यांच्या मार्गदर्शनाने पथनाट्याच्या माध्यमातून लाखो युवक देशविदेशात हे विचार घेऊन जात आहेत.
 
यंदा देशभरातील २० राज्यांत तसेच विदेशातील इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आखाती देश या सारख्या विविध देशांतही युवकांच्या जवळपास १४,५०० टीम्स म्हणजे दीड ते पावणे दोन लाखांहून अधिक युवक ‘दिखावे की दुनिया’ या पथनाट्यातून सर्वांना विचार करण्यास प्रवृत्त करणार आहेत. विविध भाषांमधून ही पथनाट्ये १२ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट, २०२२ या काळात सादर करण्यात येतील. विशेष म्हणजे कोणत्याही प्रलोभनाशिवाय आपलं शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून व या सर्वातून वेळ काढून हे युवक पथनाट्य सादर करणार आहेत. आज ‘आम्हांला असं वेगळं काही करायला वेळच नसतो’ असं जिथे जागोजागी ऐकू येतं त्याच वयोगटातील हे युवक हा उपक्रम करणार आहेत हे विशेष. 
 
आज समाजात सर्वत्र दिखाऊपणाचे वर्चस्व आहे, आपले संबंध, मैत्री, नाती, आपला व्यवहार या सर्वच ठिकाणी एक प्रकारचा कृत्रिम दिखाऊपणा, ढोंग आणि रूक्षपणा आलाय असं वाटतंय. अशा दिखाऊ दुनियेतही ईश्वराला केंद्रस्थानी ठेवून एक निरपेक्ष, दैवी, दिखावाविरहित संबंध निर्माण होऊ शकतो अशाप्रकारचा एक संदेश हे पथनाट्य देते. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेले विचार इतके प्रभावी आहेत की ते जीवनात साकार झाल्यास व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र असा उत्तरोत्तर विकास शक्य आहे. मात्र हे प्रभावी विचार तरुणांना मिळत नाहीत, तरुणांपर्यंत पोहोचतच नाहीत. कृष्णाचे विचार मिळाले तर आजचा युवान देखील केवळ स्वार्थी न होता एक उन्नत, कृतज्ञ जीवन जगू शकतो असेच काहीसे विचार या पथनाट्यातून पाहायला मिळणार आहेत. 
 
दहीहंडीची उंची व थर यावरच बाष्कळ चर्चा व वादंग करताना आपण श्रीकृष्णाची, त्याच्या विचारांची आणि दहीहंडीच्या उत्सवाची ‘उंची’ किती कमी करतोय याचं भान समाजात कुणालाच राहिलेलं नसताना स्वाध्याय परिवाराच्या युवकांची जन्माष्टमी निमित्त सादर होणारी ही पथनाट्ये आशेचा एखादा किरण फुलवू शकतील हे नक्की !! 
 
 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.