तिच्या पदस्पर्शाने घर फुलायला लागत, भांडी आणि कपडे हसायला लागतात, टॉयलेट आणि बाथरूम चमकायला लागतात. अशी कामवाली प्रत्येक मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये रोज कामाला येते आणि जाते. आपल्याला तिच्याबद्दल कधीच सोयरसुतक वाटत नाही. पण थोडीसीही चुक कुठं घडलेली असेल तर मात्र आपण आपला घसा साफ करून घेतो. ती मात्र खाली मान घालून सगळं ऐकून घेते कारण तिनं जर बंड केलं तर तिची ही नौकरी स्वाहा होणार. अशा किती तरी बायकांना कोण देणार सरकारी नौकरी?
आंब्याचा मोहर फुलण्यापूर्वीच गळून पडावा तस आयुष्य वाट्याला आलेलं असत, लोकांच्या घरी कामवाली म्हणून काम करणाऱ्या बायकांच्या. घरची काम करा, पोराबाळांचा उरका आणि मग द्यायची असते टक्कर ढीगभर कामांना. हाताला लागत जाईल तसे ते राकट हात कामाचा डोंगर दिवसभर फोडत राहतात. कितीही थकवा आला ,दुखलंखुपल तरी व्यक्त करायला तिला वेळ नसतो कारण तिचा हात चालला तर तिच्या संसाराचा गाडा चालणार असतो.
व्यसनी नवरा मात्र रोज तिच्या कष्टाच्या कमाईवर आपला हक्क सांगत असतो, जर सहजासहजी बधली नाही तर मोडक्या घरातील एक एक वस्तू रोज गायब व्हायला लागते. अशा दुविधेच्या कात्रीत ती सापडलेली असते, रोज आपलं मरण उघड्या डोळ्यांनी बघते. थोडी रूपवान असलीच ती तर काळजाला करपणारे किस्से रोज ती अनुभवते. तिचा प्रश्न कष्टाचा नसतो पण दिवसभर इतकं कष्ट करून सुखाचा घास पोटात ढकलला जावा आणि या मरण यातनेतून मुक्तता व्हावी ही अपेक्षा असते. एक वेगळंच दुष्टचक्र मागे लागलेलं असत, ते काही पाठ सोडत नाही, रोज नवा प्रश्न आ वासून उभा असतो.
शेवटी काय घडत? आयुष्य शेवटाला पोहचत पण दुसऱ्यांच्या घराचे उंबरठे झिजवण काही बंद होत नाही. आधी भविष्यासाठी, मुलाबाळासाठी आणि उतारवयात शरीराच्या गौऱ्या मसनवाट्यात जात नाहीत तोपर्यंत झुंज देण्याची कसरत चालूच राहते…
– डॉ.कृष्णा सुभाष सपाटे