प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या अप्रगत मुलांवर शालेय अभ्यासक्रमांबरोबरच सामाजिकता व राष्ट्रीयत्वाचा संस्कार व्हायला हवा. यामुळेच या वयातील मुलांची विविध उपक्रमांसह प्रयोगांतून बौद्धिक व शारीरिक जडणघडण होण्याची गरज असते. त्यादृष्टीने आगामी काळात शाळांमधून अशा उपक्रमशील शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा निर्धार नांदेड शहरातील अधिकांश शाळांनी केला असून यातीलच राष्ट्रमाता इंदिरा गांधी शाळेतील हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा असे सांगितले गेले की ज्या मुलांना काहीच येत नसल्याचे समजले अर्थात इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत ते विद्यार्थी अप्रगत आहेत, तर त्यांना इतर हुशार विद्यार्थ्यांच्या तुलनेत दर्जात्मक सुधारणा होण्याकरिता अधिकची तासिका घेऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रविवारी शाळेचा उपक्रम राबवावा असे राज्य शिक्षण विभागाचे आदेश आहेत.
हा उपक्रम राबवितांना ज्यांना ज्ञान कमी आहे, वाचन कौशल्य नाही अशा मुलांना यामध्ये सामावून घेतले जावे असे संकेत होते. शासन आदेशाची अंमलबजावणी केवळ कागदावर न करता नांदेड शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी शाळेच्या ‘शिक्षक टीम’ने या उपक्रमातून विद्यार्थ्यां प्रती असलेली शैक्षणिक बांधिलकी दाखवून दिली आहे. एरव्ही राज्य शिक्षण विभाग असे अनेक उपक्रम राबवित असतो परंतु त्याची अंमलबजावणी शून्य ठरते. कारण तर त्याला शिक्षकांकडून अपेक्षित असे प्रतिसाद मिळत नाही. परंतु राष्ट्रमाता इंदिरा गांधी शाळेच्या शिक्षकांनी अप्रगत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रविवारी उपक्रम राबवून कसोटीचे प्रयत्न करत असल्याने या शाळेतील उपक्रमाची चर्चा शहरात सर्वदूर पसरली आहे. कोरोना काळात शाळा बंद असल्याकारणाने विद्यार्थ्यांची मोठी शैक्षणिक हेळसांड होत असून ऑनलाइन-ऑफलाइनच्या प्रयत्नात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परंतु या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे जे दिवस वाया गेले ते भरून काढण्यासाठी हा उपक्रम हाती घेऊन राबविल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांचा कोरोना काळात झालेले नुकसान भरून निघत आहे. यासंदर्भात ‘सकाळ’ने शाळेचे संस्थाचालक दिगांबर क्षिरसागर यांची भेट घेऊन या उपक्रमाची माहिती घेतली असता रविवारी शाळा उपक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक अध्यापन कार्यासाठी हजेरी लावत असू. इतर शाळांपेक्षा आमच्या शाळेतील मुले पुढे जातील हा उद्देश ठरवून हा उपक्रम सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले.