गुजरात सरकारने इयत्ता ६ वी ते १२ वीच्या शालेय अभ्यासक्रमात श्रीमद भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, आपल्या परंपरांविषयी जोडणे तसेच त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणे हा यामागील उद्देश असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून गुजरातमधील शाळांमध्ये हा बदल लागू केले जाण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान शिक्षण मंत्री वाघानी यांनी सांगितले आहे की भगवद्गीता काही भागांमध्ये सादर केली जाईल. हा पवित्र ग्रंथ इयत्ता ६ वी ते ८ वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये कथा आणि मजकुराच्या स्वरूपात सादर केला जाईल. इयत्ता ९ वी ते १२ वी साठी, प्रथम भाषेच्या पाठ्यपुस्तकात कथा आणि मजकूर या स्वरूपात सादर केले जाईल. शालेय अभ्यासक्रमात भारतीय संस्कृतीचा समावेश विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास पोषक ठरेल, असे परिपत्रकात पुढे नमूद केले आहे.