औरंगाबादः दुष्काळाने होरपळून गेलेला मराठवाडा वेळेत पाऊस न पडल्याने केविलवाणी अवस्था झाली आहे. या वर्षी पहिल्यांदाच मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. सुरुवातीलाच दमदार पावसामुळे पेरलेलं बियाणे उगवलेसुद्धा मात्र त्यानंतर गायब झालेला पाऊस अद्याप तरी परतला नाही. आता पंधरा दिवस होत आलेत तरी मराठवाड्यात एकही दमदार पाऊस झालेला नाही. मराठवाड्यातील तब्बल ३६ तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने दांडी मारल्याने दुबार पेरणीच संकट शेतकऱ्यावर ओढावलं आहे.