पुणे | ‘लाॅ’ च्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी अनेकदा पाठपुरावा करूनही विद्यापीठ प्रशासन काहीच उपायात्मक भूमिका बजावत नाही. कुठलेही ठोस पाऊल उचलत नाही. अश्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आज आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे महानगर शाखेने पुणे विद्यापीठात मूक आंदोलन केले. या आंदोलनात विद्यार्थ्यांनी तोंडावर काळ्या फिती बांधून विद्यापीठाचा निषेध व्यक्त केला. परीक्षेच्या दोन पेपर मध्ये किमान एक दिवस सुट्टी असावी, परीक्षेच्या वेळेस उत्तरपत्रिकेसोबत दोन पानांऐवजी सोळा पानी पुरवणी असावी, परीक्षेच्या नंतर विद्यार्थ्यांना स्कीम ऑफ मार्किंग कळवण्यात यावे, प्रत्येक पेपरमध्ये ४५ मार्क उत्तीर्ण होण्यासाठी असावे, ऍग्रीगेट पद्धत नसावी, पुनर्मूल्यांकनानंतर एक मार्क वाढला तरी देण्यात यावा, विधीचे पेपर मराठीत देता यावेत अशा मागण्यांचे निवेदन परीक्षा नियंत्रकांना देण्यात आले. या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर यापुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र आंदोलन छेडेल असे पुणे महानगरमंत्रीने सांगितले आहे.