हल्ली रोजच्या बातम्या पाहून घरच्यांना धाकधुक लागते, कुठे पावसामुळे पूर येतोय तर कुठे पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे अख्या ट्रेकिंग क्षेत्राला बेजबाबदार असल्याचा बट्टा लागतोय. असं असतांना फेसबूकवर व्हायरल झालेला हरिहर गडाचा थ्रिलिंग व्हिडीओ पाहिला आणि तिथे जाण्याची इच्छा झाली. म्हटलं, सुंदर आयुष्याच्या पुस्तकात एका नवीन पानाची अविस्मरणीय भर टाकावी.
भटकंतीच्या मान्सून ट्रेकच्या यादीतील हा एक ट्रेक!
ठरल्याप्रमाणे रात्री अंधेरी मेट्रो स्टेशन जवळ भेटलो आणि ११:१५च्या दरम्यान बसमधून डेस्टीनेशनकडे जायला निघालो. आम्ही एकूण ४०-४५ ट्रेकर्स होतो, काही नवीन तर काही जुने. त्यातीलच आमचा मित्र प्रकाशचा वाढदिवस होता. बसमध्ये त्याचा वाढदिवस साजरा केला आणि अंताक्षरीला सुरुवात झाली. गाण्याची मैफिल आणि त्यावर पाय थिरकत होते. जीवाच्या आकांताने ओरडून गाणं म्हणता म्हणता सगळेच शांत झाले आणि झोपेच्या गावी गेले. बाहेर पाऊस होता म्हणून वातावरण गार झालं होतं.
सकाळी ५ वाजता झोपेतच बसमधून पाहिलं तर धो धो पाऊस सुरु होता आणि भुडूक अंधारात आम्ही एका गावी थांबलो. पुन्हा झोपलो आणि ६ वाजता उठलो. बऱ्यापैकी उजेड झाला होता आणि पाऊसही थांबला होता. फ्रेश झालो आणि नाश्ता केला.
आम्ही ज्या गावी होतो, ते गाव म्हणजे नाशिक जिल्ह्यातील निरगुडपाडा गाव हे आदिवासी गाव. पावसामुळे हिरवळ होतीच म्हणा, पण नद्याही तुडूंब भरुन वाहत होत्या.
काही महत्त्वाच्या सूचना देऊन आम्ही थ्रिलींग हरिहर ट्रेकला सुरुवात केली.
इगतपुरीपासून ४८ किलोमीटर लांब असलेला हरिहर गड समुद्र सपाटीपासून ३,६७६ फूट उंचीवर आहे. पावसाळ्यात हा गड जितका सुंदर दिसतो तितकाच तो चढायलाही कठिण आणि धोकादायक आहे.
मनात उत्साह घेऊन गडाकडे पायपीट करू लागलो. एव्हाना पाऊस ही कोसळू लागला होता. मध्ये एक नदी होती, ती सहजपणे पार केली. चोहीकडे असलेली हिरवळ पाहत, पायांना चिखलेची आंघोळ घालत आम्ही चालत होतो. हरिहरला म्हणे सलग ३ दिवसांपासून वादळी पाऊस होता, ते तिथे उन्मळून पडलेल्या झाडांवरुन समजत होतं. पावला- पावलावर खळखळणारे झरे होते. हिरवीगार वाट धरून आम्ही पुढे चालत गेलो. डोंगराच्या कडेने चालताना खोल दरी दिसत होती. हळू हळू उंची गाठली आणि सारं धुक्याने झाकून टाकलं. मध्येच एक अवघड चढण आली, तेव्हा बेस कॅंपमध्ये शिकलेल्या माऊंटेनेरींगचे धडे आठवले. एकमेकांना मदत करत आम्ही ती ही चढणही गाठली. पावसाचा वर्षाव सुरुच होता.
त्या गार वातावरणात सर्वांना चहाची तलप लागली. वाटेत लागणाऱ्या दुकानात सगळे गरम चहावर तुटून पडले. सगळ्यांचा सुका खाऊ (जो की आता सुका राहिला नव्हता) तो बाहेर येऊ लागला. तहान सहसा लागत नव्हती पण भूक मात्र सारखी लागत होती. प्रत्येक टप्प्यावर सगळे ‘शिस्त’ पाळत सेल्फी काढत होते. योगायोगाने या वेळी गडावर फक्त भटकंती परिवार आणि सागरचा मुंबई ट्रेकिझंज ग्रूप होता, दोघेही शिस्तीच्या बाबतीत खूप काळजी घेतात. असो, तर मध्येच पेट पूजा करून पुन्हा पुढे निघालो आणि वर पोहोचलो. सगळ्यात कठिण आणि हरिहर ज्या धोकादायक गोष्टीसाठी प्रसिद्ध मानला जातो अशा टप्प्यावर, अर्थातच ८० अंशाच्या कोणातली चढण!
हो, ही चढण ८० अंशाच्या कोणात असल्यामुळे त्यावर चढणं जरा कठिणच आहे. त्यात मुसळधार पाऊस अन् उनाड वारा अडचणी वाढवतच होता. नेहमी येणाऱ्या ट्रेकर्सनी त्या चढत्या पायऱ्यांवर पकड मजबूत करण्यासाठी खड्डे केले होते, जेणेकरून वर चढण्यासाठी लोकांना सोपं पडावं. आम्ही एक एक करून पावले टाकत गेलो, तसा पावसाचा वेग वाढत गेला. सत्या दादाने सांगितल्याप्रमाणे जॅकेटची चैन वरपर्यंत लावली आणि हूड घट्ट डोक्याला बांधून घेतला. असं केल्यास वाऱ्यामुळे हूड उडत नाही आणि चढणाऱ्याचा तोलही जात नाही. आमच्या सुरक्षिततेसाठी दोरही खाली सोडला होता, ज्याची गरज तशी लागली नाही. पण हा कठीण परिस्थितीत खूपच महत्त्वाचा आहे.
हळू हळू काळजीपूर्वक चढून आम्ही गडाच्या पहिल्या मुख्य दरवाजाकडे पोहोचलो. तिथे भिंतीवर लहान गणपती कोरला होता, तर एक आडोसा होता, जिथून पाण्याची बरीक धार लागली होती. तिथून पुन्हा गडाच्या कडेने चालत आम्ही दुसऱ्या चढणीकडे पोहोचलो. या पायऱ्याही तशाच धोकादायक होत्या. मध्येच एक लहान गुंफा लागली, आणि ती पार करून आम्ही दुसऱ्या दरवाजाकडे पोहोचलो. तिथे राग येण्यासारखी एक गोष्ट होती, कोणती तरी भलतीच टोळी तिथे स्पीकरवर गाणी लाऊन धिंगाणा घालत होती. म्हणजे एवढ्या उंचीवर निसर्गाच्या सानिध्यातही मोठ्याने फिल्मी गाणी लाऊन धिंगाणा घालण्यात कसली मजा वाटते बाप्पाच जाणे!
मग तिथेच ती निराशा सोडून आम्ही पुढे निघालो.
काही पावले पायपीट करून एक पाण्याचा कुंड लागला. एवढ्या उंचीवर तो कुंड पाहून आश्चर्यच वाटलं. तिथून पुढे निघालो आणि अजून एक टोक लागलं, जे की शेवटचं टोक होतं. तेही मोठ्या हिमतीने चढलो, आणि खूप जास्त आनंद झाला. नाही नाही म्हणत अख्या भटकंती परिवाराने ‘हरिहर’ गड सर केला, याचं खूप जास्त कौतुक वाटतंय.
त्या टोकावर पोहचून महाराजांचा जयघोष केला आणि एक ग्रूप सेल्फी काढला.
अखेर हरिहर गड आम्ही सर केला याचं समाधान घेऊन गड उतरायला सुरुवात केली. अलीकडेच असलेले अजून ४ कुंड पाहिले आणि हसत खेळत उतरू लागलो. आता दुपार झाली होती आणि खाली दुसरा ग्रूप वर येण्यासाठी थांबला होता. पहिला दरवाजा उतरलो आणि खरी परिक्षा आमची मुख्य दरवाजावरून खाली उतरताना जाणवली. सुरुवातीच्या २ पायऱ्या सहजपणे उतरलो, पण अचानक पाऊस वाढला आणि वेड्यासारखा वारा सुटला. आता तोल जातो का असं वाटत होतं, तेवढ्यात गणेश दादाने धीर दिला. जसे आहोत तसंच थांबायला सांगितलं. एकदा खाली पाहिलं तर तो नव्याने आलेला ग्रूप पायथ्याशी दिसत होता. वारा सुटला, धुक साचलं आणि खाली पाहिलं तर काहीच दिसत नव्हतं. तेवढ्या वाऱ्यात जर मी आगाऊपणा केला असता तर ते फक्त माझ्याच जीवावर बेतलं नसतं तर त्याचा परिणाम माझ्या अख्या भटकंती परिवाराला आणि घरी जीव टांगणीला लाऊन बसलेल्या आई वडिलांवरही झाला असता. तसं न करता मी शांतपणे थांबायचं ठरवलं. सह्याद्री आपल्याला जोखीम उचलू नका असं म्हणत नाही, तर त्या पायऱ्याप्रमाणे आपलं आयुष्यदेखिल आहे आणि ऊन, वारा, पाऊस येणारच, तेव्हा वेळ द्या, स्वतःच्या जीवावर बेतेल असं काहीच करू नका हे शिकवतो. अगदी अशी परिस्थिती होती की एक पाऊल चुकीचं आणि मी पार खोल दरीत!
जोखिम उचलावी, पण त्यातून शिकावं असं मला वाटतं!
असो, वाऱ्याचा वेग कमी झाल्यावर आम्ही सगळे हळू हळू सुखरूप ८० अंश कोणातल्या पायऱ्या उतरुन पायथ्याशी पोहोचलो. खाली जाण्यास पुन्हा पायपीट सुरु केली. पावसामुळे अंग गारठलं होतं आणि पोटात कावळे ओरडत होते. पावसामुळे अंग गारटलं होतं. त्यात आमच्या सौरभच्या दाताचं नुकतच रुट कॅनाल झाल्यामुळे आम्ही मॅगी खायचं ठरवलं. त्या धो धो पावसात झोपडीत उभं राहून गरम गरम मॅगी खाण्याची मजाच निराळी. त्याच बहाण्याने आमची ‘ट्रेकिंग वाली मॅगी’ स्टोरी तयार झाली. हसता हसता गाणी म्हणत आम्ही कधी ट्रेक पूर्ण केला समजलच नाही. चिंब भिजून बसकडे गेलो, फ्रेश झालो आणि जेवायला पळालो. सगळेच दमले होते म्हणा, पण सगळ्यांजवळ आता एक वेगळाच अनुभव होता. सह्याद्रीने घेतलेल्या परिक्षेत पास होण्याचा आनंद होता आणि अर्थातच माझ्या ‘आयुष्याच्या सुंदर पुस्तकात नविन अनुभवाच्या पानाची भर झाली होती’
नविन ट्रेक, नविन अनुभव.. अख्या ट्रेकमध्ये पाऊस पडणं हा त्रास नव्हे, तर ललकारी होती. यावेळी माझा मोबाईल बॅगेत होता आणि सगळे फोटो सौरभ नखरेकरने काढले आहेत!
माझं हरिहरवर प्रेम जडलंय बरं का!
‘ हिरवा शालू नेसून
धुकात दडलेला गड,
उनाड वारा झेलत
कणखर उभा हरिहर!’
– प्राची मोहिते