देशातील बारा कोटी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तिर्थस्थानाला बंजारा समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पोहरादेवी शक्तीपीठ आणि बंजारा समाज याचं अध्यात्मिक नातं आहे. त्यामुळे बंजारा व्यक्तिच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मुळात क्षत्रिय असलेला बंजारा समाज पूर्वी राजपूत होता. भारतात मोघलांनी आक्रमक केल्यानंतर राजपूतांचा पराभव झाला. तेव्हा स्वतःचे अस्तित्व, धर्म, संस्कृती टिकवण्यासाठी राजपूतांना जंगलात स्थलांतर करावे लागले. यातून काही वर्षानंतर एक जमात जन्माला आली ती म्हणजे बंजारा होय.
अंधारमय झालेल्या ह्या समाजात रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांडाने ग्रासले होते. अशिक्षीतपणामुळे समाज लयास गेला होता. अशावेळी संत सेवालाल महाराज यांचा जन्म झाला. विचार आचारापासून भरकटलेल्या समाजाला आपल्या अध्यात्मिक वाणीने चैतन्य देण्याचं काम संत सेवालाल यांनी केले. संपूर्ण देशात भटकंती करुन समाजात प्रबोधन केले. “दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे माझे कर जुळती” असे संताचे वचन आहे. संताचा जन्मच मुळात विश्वाच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या उद्धारासाठी असतो. धर्म वेगळा असेल, पंथ वेगळा असेल, जात वेगळी असेल पण संतांनी माणूसकी हाच धर्म शिकवला आहे. संत सेवालाल पोहरादेवी या गावात समाधी घेतल्यामुळे या गावाला तिर्थक्षेत्र म्हणून महती मिळाली आहे. वर्षातून रामनवमी, दिवाळी आणि गुरु पौर्णिमेला याठिकाणी जत्रा भरते. या जत्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, राजस्थान, पंजाब, गोवा, दिल्ली व देशातील इतर प्रांतातील बंजारा लोक लाखोच्या संख्येने पोहरादेवी येथे दर्शन घेण्यासाठी येतात. त्याचबरोबर इतर समाजातील भाविकभक्तसुद्धा दर्शनासाठी येतात. विदर्भात वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात पोहरादेवी हे तिर्थक्षेत्र आहे. देशातील विविध प्रांतात विखुरलेल्या बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरादेवीचा उल्लेख होते. बंजारा समाजाचे धर्मगुरु संत डाॅ. रामराव महाराज पोहरादेवीवरुनच समाज प्रबोधन करतात. आत्तापर्यंत अनेक मोठ-मोठया राजकीय नेत्यांनी या तिर्थस्थानावर येवून दर्शन घेतले आहे. बंजारा समाजातील व्यक्तीला या शक्तीपीठाची आयुष्यात एकदातरी ‘पोहरादेवी दर्शन’ व्हावे ही इच्छा असते.
– रवी चव्हाण