मुंबई | अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाबाहेर जोरदार आंदोलन केले. मुंबई विद्यापीठाने रखडलेले निकाल लवकर जाहीर करावेत व मुंबई विद्यापीठचे कुलगुरू यांना हटवावे हि मागणी अभाविपने केली. आंदोलन सुरु झाल्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले व त्यांनी सर्व विद्यार्थी कार्यकर्त्यांना अटक केली.
मागील काही दिवसापासून मुंबई विद्यापीठ आणि त्याचे कुलगुरू हे चर्चेचा विषय ठरलेले आहेत. कारण जुलै महिना उलटून गेला असला तरी मुंबई विद्यापीठच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील शेवटच्या वर्षाच्या बहुतांश शाखांचे निकाल अजून लागलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. अभाविपने वेळोवेळी कुलगुरूंना, राज्यपालांना, शिक्षण मंत्र्यांना भेटून निवेदने दिली. कोंकणातील विविध महाविद्यालयांसमोर, मुंबई विद्यापीठात निदर्शने केली परंतु तरी सुद्धा मुंबई विद्यापीठचे ढिम्म प्रशासन व कुलगुरू यांनी प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे अभाविपने काल दि. ३१ जुलै रोजी मुंबई विद्यापीठच्या कालिना परिसरातील कुलगुरूंच्या घराबाहेर निदर्शने केली. पण त्यावेळी तेथील पोलिसांनी विद्यार्थी कार्यकर्त्यांना कुलगुरुंसमोर अमानुषपणे मारहाण केली आणि अटक केली.
याच वर्षाच्या एप्रिल महिन्यात मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी हेकेखोर भूमिका घेऊन शेवटच्या वर्षाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी online पेपर तपासणी पद्धत कंत्राटी पद्धतीने एका कंपनीला दिली. ज्यात आता कुलगुरूंवर भ्रष्टाचाराचा आरोप सुद्धा होत आहे. या online पेपर तपासणीतील असंख्य त्रुटींकडे दुर्लक्ष करून हि पद्धत राबवण्यात आली. त्यामुळे जुलै महिना उजाडला तरी शेवटच्या वर्षाचे निकाल लागले नाहीत. त्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसला आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी कुलगुरूंना यावरून चांगलेच खडे बोल सुनावले आणि ३१ जुलै पर्यंत सर्व निकाल लावण्याची आज्ञा दिली. घाईगडबडीत महाविद्यालयांना सुट्टी देऊन, सुट्टीच्या दिवशी काम करवून घेऊन कसेबसे शेवटचे साडेतीन लाख पेपर सोडले तर बाकी उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण केली. त्यामुळे आता अभाविप अशी मागणी करते कि मुंबई विद्यापीठाने त्वरित रखडलेले सर्व निकाल पुढील 5 दिवसात लावावेत. त्याचबरोबर राज्यपालांनी त्वरित मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची हकालपट्टी करावी आणि छायांकित प्रत व पुनर्मुल्यांकनासाठी लागणारा वेळ व शुल्क कमी करावे.