मैत्री म्हणजे हे … मैत्री म्हणजे ते …!! काल दिवसभरात मैत्री या विषयवार बरंच काही ऐकलं, वाचलं. आमच्या शाळेच्या दिवसांत मैत्री म्हणजे काय? आणि ती कशी असावी? यासाठी शालेय पाठय पुस्तकामध्ये श्रीकृष्ण व सुदामा यांच्या मैत्रीवर आधारीत “सुदामाचे पोहे” वाचून मैत्री काय असते, याची आपोआपच समज यायची. थोडं पुढच्या वर्गात जसे जायला लागलो तेव्हा एका वर्गात शिकणार्या बरयाच मुली, मुले दीर्घकाळ एकत्र शिकायला होतो. एका शाळेत सात वर्ष त्यानंतर दुसऱ्या शाळेत तीन- चार वर्ष!! यावेळेत आम्ही साजरी केलेल्या मैत्री दिवसांत हातावर बांधणार्या रंगीत रिबन आल्या होत्या. आणि कुणी जर विचारलं “तू माझ्याशी मैत्री करशील का ?” तेव्हा निखळ मैत्रीला नाकारण्याची गरजही कोणालाही वाटत नसायची. आपणहुन त्या निरागस मैत्रीचा घटक होऊन जायचो. आजच्यासारखे, असे मैत्रीचे सोहळे आम्ही कधी पहिलेच नाहीत जे आज सोशल मीडियावर रंगले जातात.
आपल्याकडे आता प्रत्येक दिवस साजरी केला जातो आणि तो व्हावा या मताशी मी सुद्धा आहे. आपल्या जीवनात होणारे प्रत्येक क्षण आपण खूप उत्साहाने साजरी करतो आणि त्या सुखात सहभागी असतो तो म्हणजे मित्र! दुःखातही असतोच पण जगात आपल्याला आनंदाला शिखरावर नेणारा हा मित्रांपलीकडे कोणीच नसू शकतो. कारण मैत्रीची भावना जाणणारी मी सुद्धा आपल्याच सारखी व्यक्ती आहे.
असो! जस प्रेम सांगून होत नाही तसच मैत्रीही कोणाशी ठरवून, सांगून नाही होत. हो पण हल्ली “we are friends” असं बरचं बोलून झालं तरी खात्री करून घ्यावी लागते. कारण कोणत्या नात्याला काय नाव द्यावं हे हल्लीच्या पिढीचा गोंधळच आहे. हा झाला गमतीचा विषय…
जगाच्या पाठीवर सर्वच नाती ही खूप महत्वाची असतात. मग तरीही मैत्री वेगळी का असते?, आपल्या जवळ नातेवाईक जरी असले, तरी मात्र आपल्याला जीवाला जीव देणारे मित्रच नेहमी का आपलेसे वाटतात?, हवेहवेशे वाटतात? कसा आहेस?, काय रे काय झालंय सांग मला?, आज तू नेहमी सारखा वाटत नाहीस?, काही अडचण आहे का? आणि यातून घडत जाणारा मनमिळावू सवांद हे मैत्रीच नात घट्ट करत जात. वास्तविक आपल्या जवळची सर्वच लोक आपल्याजवळ नेहमी असली तरीही आपल्या मनाचा भार हलका करणारा, आपल्या चुकांना मार्ग दाखवणारा, मदतीला धावणारा आपल्यासाठी फार महत्वाचा असतो आणि तोच आपला खरा मित्र असतो.म्हणतात एकतरी नातं असावं आपल्या मनाला जपणार ते हेच असावं.
पण आज खऱ्या अर्थाने आधुनिक मैत्रीचे दिवस आहेत, असं म्हणायला हरकत नाही. काळाप्रमाणे खूप काही बदल आपण अनुभवत आहोत. हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्रीचं नातं जपायला एक माध्यम मिळालं आहे आणि यावर मैत्री दिवस किंवा अन्य कोणताही आवडीचा दिवस साजरी करण्यासाठी तरुणाई मोठ्या उत्सहाने अग्रभागी असते. पण याच माध्यमातून तरुणवर्ग सोशल नेटवर्कच्या जाळ्यात अडकायला लागला आहे. बरयाचवेळा या माध्यमातुन होणाऱ्या मैत्रीला तरुणाईचा अधिक मज्जाव आहे. एखादा अनोळखी वक्तीला सोशल मीडियावर, मित्र बनवण्याचे औदार्य दाखवणं तितकंस सोप्प राहिलेलं नाही आहे. त्यामुळेचं सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. कारण आधुनिक मैत्रीची वाटचालही गंभीर होत आहे. फेक अकाउंट बनवून फसवणूक करनं, ब्लॅकमेल करनं, यासाठी फेसबुक,इंस्टा व अजून यांसारख्या अनेक माध्यमांचा वापर होत आहे. दोन वर्षापूर्वी मुलीच्या नावाने खोटे अकाउंट बनवून मुंबईतील युवकाला, एका मुलानेच ब्लॅकमेल केले आणि यातून घाबरून त्या मुलाने आत्महत्या केली. तेव्हा सोशल नेटवर्क वरून केल्या जाणाऱ्या मैत्रीला किती महत्व द्यावे; अन्यथा द्यावे की नाही? याची तरुणाईने काळजी घ्यायलाहवी हेच आंतरराष्ट्रीय मैत्रीदिनी सांगेल अन्यथा, आधुनिक मैत्री मध्ये आपण नेहमीच मागे राहू.
– पूजा उबाळे