औरंगाबाद | हनुमंतखेडा येथील सीमा राठोड याअल्पवयीन मुलीचा निर्घृण खून करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी सकल बंजारा समाजाने केली. ‘मराठा क्रांती मोर्चा’ प्रमाणे ‘बंजारा आक्रोश मोर्चा’त महिला अग्रभागी होत्या. सीमा राठोड या मुलीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी हनुमंतखेड अत्याचार विरोधी समितीच्यावतीनं औरंगाबादमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने बंजारा समाज सहभागी झाला. हनुमंतखेडा येथील सीमा राठोड या पीडितेला न्याय देण्यासाठी या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पीडितेच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत करा, असे फलक देखील आंदोलकांनी दाखवले. ‘मराठा क्रांती मोर्चा’ प्रमाणे ‘बंजारा आक्रोश मोर्चा’त महिला अग्रभागी होत्या. बंजारा समाजाचा पारंपारिक वेशभूषेत महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यात तरुणांची संख्या देखील लक्षणीय होती. औरंगबाद जिल्ह्यातील हनुमंतखेडा याठिकाणी सीमा राठोड ही मुलगी पाणी आणण्यासाठी गेली असता, तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी पीडितेची वीस फूट दरीत फेकून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरला होता.या मोर्चाने बंजारा समाजाची ताकदच दाखवून दिली. मोर्चात बंजारा तरुण- तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. मूकमोर्चा असल्यामुळे कुणीही घोषणाबाजी केली नाही. शहराच्या प्रमुख रस्त्यांवरुन हा मोर्चा दुपारी अडीचच्या सुमारास विभागीय आयुक्तालयावर धडकला.तेथील भव्य पटांगणात मोर्चेकरी बसून गेले. तेथे झालेल्या सभेत रवीना राठोड, वृंदा पवार व भारती राठोड या तीन मुलींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तिघींनीही जय सेवालाल म्हणत आपल्या भाषणाचा शेवट केला. भटक्या विमुक्ताचे नेतेे माजी खासदार विद्यमान आमदार हरिभाऊ राठोड, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष राजू नाईक, बंजारा टायगर्सचे अध्यक्ष आत्माराम जाधव, नंदू पवार, सामाजिक कार्यकर्ते संदीप चव्हाण जिंतूरकर याप्रसंगी उपस्थित होते. त्याचबरोबर या आक्रोश मोर्चात महाराष्ट्राच्या तळागाळातून बंजारा समाज एकवटला होता.