तिहेरी तलाकासंदर्भात काल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या दिवसी हमीद दलवाईंची आठवण येणे अपरिहार्य आहे. हमीद दलवाईंनी महात्मा फुलेंचा आदर्श घेवून १९७० मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली आणि त्याद्वारे मुस्लिम समाजात प्रबोधनाचे, विशेषत: मुस्लिम स्त्रियांसाठी काम सुरू केले. त्या आधी १९६६ साली त्यांनी सर्वप्रथम सात मुस्लिम स्त्रियांचा विधानभवनावर मोर्चा काढून मुस्लिम स्त्रियांच्या न्याय हक्काच्या लढ्याची मुहूर्तमेढ रोवली. मुस्लिमांसाठी द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू करावा व तोंडी घटस्फोटासंबधी कायदा करावा अशी मागणी करणारे पाचशे मुस्लिम स्त्रियांच्या सह्याचे निवेदनही त्यांनी १९७० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांना दिले होते. त्यानंतर १९७१ मध्ये पुण्यात मुस्लिम महिला परिषद घेवून त्यांच्यावरच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडली. भारतामध्ये प्रथमच सर्वसामान्य मुस्लिम स्त्रिया या परिषदेत जाहीरपणे आपली दु:खे सांगून समान अधिकाराची मागणी करत होत्या. त्यांनी मुस्लिम स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. ज्या वेगाने त्यांनी कामाला सुरुवात केली तो पहाता आज मुस्लिम स्त्रिया खूप पुढे असत्या हे खात्रीने सांगता येते. स्वत: दलवाई पूर्ण निरिश्वरवादी होते. त्यांचा शास्त्रशुद्ध बुध्दीवाद आणि वैज्ञानिक दृष्टीकोण बहुसंख्य मुस्लिमांना पेलणारा नव्हता. अल्पवयातच म्हणजे १९७७ साली त्यांचा मृत्यू झाला. त्यातच त्यांनी मृत्यूपश्चात आपले दफन न करता दहन करावे असे सांगीतल्याने कट्टरवाद्यांना आयतेच कोलीत मिळाले. ते त्यांना काफर, हिदुत्त्ववाद्यांचा हस्तक म्हणू लागले. त्यामुळे मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडे येण्यासाठी लोकं बिचकू लागले. परिणामी मंडळ बंद पडते की काय अशी परीस्थिती निर्माण झाली. परंतू त्यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई, मुमताज रहिमतपूरे, ऐनुल अत्त्तार,सय्यदभाई, वझीर पटेल, हुसेन जमादार , अन्वर राजन, बाबुमियॉं बॅंडवाले या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तलाक मुक्ती मोर्चा काढून हा प्रश्न लावून धरला. या मोर्चाला भयंकर हिंसक विरोध झाला आणि जीव वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांना परतावे लागले. परंतु हा मोर्चा अयशस्वी झाला असे न म्हणता हुसेन जमादार यांनी ती आमच्या यशाची पहिली पायरी आहे असे म्हटले होते. ते आज खरे ठरले पण हे पाहण्यासाठी आज जमादार जिवंत नाहीत.
– सुदाम राठोड