भारतीय शास्त्रात म्हटले आहे अतिथी देवो भव: आपल्या देशात पाहुण्यांना देवाचा स्थानं दिलं जातं किंबहुना देवाप्रमाणेच आपण घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करत असतो. मात्र, विद्येचा आराध्य दैवत श्री गणपतीचा आपल्या हट्टासाठी अवमान करण्यात आपली पीढी सरसावलेली दिसते. दरवर्षी गणेश चतुर्थीला संपूर्ण देशात गणपतीचे आगमण होत असते. राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात मोठा सणच जणू साजरा होतो. अनेक मंडळ यानिमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवितांना दिसतात. कुठे १० दिवसाचा घरगुती गणपती तर कुठे ५ दिवसांचा गणपती. मात्र एक खटकणारी गोष्ट जरी कुठलीही असेल तर ती आहे दीड दिवसाचा गणपती…खरच दीड दिवसाचा गणपती बसवणे कितपत योग्य आहे?
आपण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना एवढ्या लवकर पाहुणचार करुन परत पाठवत नाही. एकीकडे साक्षात ईश्वराच्या बाबतीत असं का घडतयं? लोकं म्हणतील आमच्याकडे वेळ नाही म्हणून आम्ही दीड दिवसाचा गणपती बसवतो. पण दीड दिवसात आपण कसे आणि किती आध्यात्मिक होवू शकतो. आणि जर का आपण एवढ्या कमी वेळेत गणपतीशी एकरुप होऊ शकत नाही तर मग काय गरज आहे दीड दिवसाच्या गणपतीची. काहींजण म्हणतील हा आमचा धार्मिक प्रश्न आहे पण जर का आपण साक्षात इश्वराचाच याप्रसंगी अवमान करतोय तर मग धर्म गेला कुठे? आपण जास्तच भौतिकवादी झालोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ते गणपती बसवत आहेत ना म्हणून आम्हीही गणपती बसविणार मग दीड दिवसाचा का होईना. किती तत्वशून्य झालोय आम्ही. खोट्या प्रतिष्ठेपोटी गणपतीचाही खेळ बनवून ठेवलाय. पण खरच आपण जी पद्धत अवलंबली आहे ती योग्य आहे का? आपण फक्त शोबाजी करण्यासाठी तर गणपती बसवत नाही ना? कारण एवढ्या अल्प वेळेत गणपतीची आराधना करुन विसर्जन करणे कसे शक्य आहे? म्हणजे दीड दिवसाचा गणपती, दीड दिवसाची शोबाजीच तर नाही ना?
– रवी चव्हाण