मुंबई | देशातील बारा कोटी बंजारा समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राला बंजारा समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत सेवालाल महाराज यांची याठिकाणी समाधी आहे. आजवर संत सेवालाल यांच्यावर बंजारा, हिंदी, पंजाबी, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमिळ, इंग्रजी अश्या अनेक भाषेत चित्रपट, गीत, पोवाडे करण्यात आले आहेत. मात्र मराठीत त्यांच्यावर गीत तयार झाले नव्हते. नवोदित दिग्दर्शक आनंद उडते यांच्या संकल्पनेतून ‘तुझा महिमा’ हे मराठीतलं पहिलं बंजारा गीत यानिमित्ताने दिग्दर्शन करण्यात आलं आहे. संत सेवालाल यांचे कार्य महाराष्ट्रातील सर्व मराठी भाषकांना कळावे यासाठी या गीताची निर्मिती करण्यात आली आहे असे आनंद उडते म्हणाले. या बहुचर्चित अल्बमचे गीत शशांक कोंडविलकर यांनी लिहिले आहे. संगीतबद्ध निनाद म्हैसाळकर यांनी केले. तर रागिणी कवठेकर आणि गौरव चाटी यांनी गायण केले आहे.