केवळ पारंपारिक व्यवसायांच्या साचेबद्ध कामांत महिला आघाडी घेत नसून आधुनिक व्यवसायाच्या जगातही आपला ठसा उमटवित आहेत. अशा महिलांच्या कर्तबगारीला शासन विविध योजनांच्या माध्यमातून सहकार्य करते. केंद्र शासनाने महिलांना भरारी मिळवून देऊन खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचा नारा बुलंद करण्यासाठी ‘स्टॅंडअप इंडिया’ ही योजना सुरू केली आहे.या योजनेतून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा महिला यांना उत्पादन, सेवा क्षेत्र यामधील व्यवसायाकरीता १० लक्ष रूपये ते १ कोटी रूपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. ‘स्टॅंडअप इंडिया’ या योजनेअंतर्गत जिल्ह्यात बुलडाणा येथील सुवर्णा धनजंय भालेराव यांचे पहिलेच कर्ज प्रकरण बँक ऑफ इंडियाने मंजूर केले आहे.
या योजनेचा लाभ घेत त्यांना ३० लाख रूपयांचे कर्ज प्राप्त झाले.यातून त्यांनी पतीच्या ट्रॅव्हल्स व्यवसायाला बळ देण्याचे ठरविले. त्यासाठी एक प्रवाशी वाहतूकीची आराम बस खरेदी केली. केंद्र शासन किंवा राज्य शासन महिलांच्या प्रगतीसाठी विविध योजना राबवितात. या योजनांचा अनुकूल परिपाक म्हणजे सुवर्णा भालेराव यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय.. ‘चाणक्य ट्रॅव्हल्स’ या समूहाचे नावाने त्यांनी ट्रॅव्हल्स व्यवसाय सुरू केला. प्रवाशांना सुविधा देण्याच्या विविध संकल्पना त्या राबवितात.‘स्टॅंडअप इंडिया’ प्रोत्साहानामुळे बसचे चेसीज खरेदी करून आकर्षक बस बनविण्याचा निर्णय सुवर्णा भालेराव यांनी घेतला. बस चेसीस लखनऊ (उत्तर प्रदेश) येथून खरेदी करण्यात आली. त्यानंतर कर्नाटकातील बंगळुरूजवळील जिगनी येथे बसची बांधणी करण्यात आली. जिगनी येथे कर्नाटक औद्योगिक वसाहतीमध्ये वीरा बॉडीजचा प्लाण्ट आहे. या प्लाण्टमधून बसची आकर्षक स्वरूपात निर्मिती करण्यात आली. एका आधुनिक व्यवसायाशी जुळल्यामुळे श्रीमती भालेराव यांनी बसला सर्व सुविधांनीयुक्त बस प्रवाशांच्या सेवेत दाखल केली आहे. हे सर्व काही शक्य झाले ते केवळ ‘स्टॅंडअप इंडिया’ योजनेमुळेच अशी भावना त्यांनी व्यक्त केली.केवळ व्यवसाय करायचा म्हणून नाही, तर व्यवसायातून आत्मिक समाधान प्राप्त व्हावं यासाठी बसमध्ये वाय फाय सुविधा, स्वत:च्या चाणक्य ब्रॅण्डचीच पाण्याची बाटली, टी.व्ही. सेट, स्वच्छ पांढरे ब्लँकेट आदी विनामूल्य सुविधा प्रवाशांना ते पुरवितात. प्रवाशांच्या सुरक्षितेकरीता बस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सज्ज आहे. तसेच चालकांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या आरोग्याची काळजीही घेतली जाते. आज बुलडाणा-पुणे अशी नियमित बससेवा सुरू आहे. आपत्या पतीच्या व्यवसायात केवळ हातभार लावून कार्य करणाऱ्या महिला आपणास दिसतात. मात्र संपूर्ण व्यवसायच आपल्या खांद्यावर घेऊन यशस्वीरित्या चालविणाऱ्या महिलांचे उदाहरण एखादेच असते. त्यामध्ये निश्चितच सुवर्णा भालेराव यांचे नाव घेतले जाईल.बॅंकेच्या कर्ज प्रकरणासाठी कागदपत्रांची जमवा-जमव करून प्रकरणाचा पाठपुरावा करणे. ‘स्टॅंडअप इंडिया’ योजनेची माहिती घेऊन प्रकरण तयार करणे, बस खरेदी करणे, ट्रॅव्हल्स व्यवसायामध्ये असलेल्या नवीन ट्रेण्डची माहिती घेऊन त्या पद्धतीने अंमलात आणणे, परिवहन विभागाकडील बसची नोंदणी, कर भरणा व अन्य कामकाज सांभाळणे आदी कामे त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली.भविष्यात मोठ्या ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये या व्यवसायाचे रूपांतर करून देश तसेच विदेशासाठीही आकर्षक प्रवासी पॅकेज देऊन पर्यटकांना पर्यटनाच्या नवीन संधी उपलब्ध करुन देण्याचे त्यांचे नियोजन आहे. पतीच्या व्यवसायात कल्पकपणे व्यवस्थापन करण्याचे आणि त्यातही आपला ठसा उमटविणाऱ्या भालेराव यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
निलेश तायडे,
सौजन्य : महान्यूज