तिच्या बागेतली फुलं आज मुंबईतल्या कित्येक तरुण तरुणींच्या वहीत आळसावली आहेत. पण आज तिची गुलाबाची बाग सुकली होती. त्यांना रंग देणाऱ्या, त्यांची काळजी घेणाऱ्या तिची कळी आज कोमेजली होती. वसई किल्ल्याच्या मागच्या बाजूला घर होतं तिचं. घरासमोर तिची बाग, म्हणायला घराची अर्धी लाकडं सरणावर पोहोचली होती. एका मुसळधार पावसात सगळं गेलं होतं.. तिचं घर, आई बाबा, आणि बागेतली सगळी झाडं. नाही म्हणायला कोपऱ्यात लावलेलं गुलाबाचं एक झाड तेवढं टिकलं. मग तिने सगळी बागच गुलाबाच्या झाडांनी सजवली.
दुपारी गुलाब खुडायचे आणि रात्री मरीन ड्राईव्ह वरच्या गुलाबी प्रेम फुलवणार्या युगुलांना विकायचे. त्यातल्या त्यात टपोरा गुलाब मात्र ती रोज जपून ठेवायची. काटे न काढता. भेळवला पेंगत असायचा.. आपल्या प्रेयसीचे गाल खाण्यात आणि त्यांच्या राजसाच्या प्रेमाच्या गप्पा चघळण्यात मश्गुल असलेल्या त्या जोडप्यांना भेळ खाण्यात रस नसायचा. मग तीच जायची गुलाब सम्पल्यावर भेळ घ्यायला. तो काटेरी गुलाब त्याच्या हातात कोंबायचा अन मग तो कळवळला की त्याचा हातच तिला मिळायचा. दोघंही खुश त्या दिवशी विपरीत घडलं. आयुष्यभर लक्षात राहील असा दिवस… .नेहमी प्रमाणे त्याला भेळ भरवताना अचानक त्याने तिला संगीतल आज तो तिची बाग पाहायला येतोय. ती खुश. आज त्यांचे हात एकमेकांच्या हातात नव्हते. एकमेकांना आपल्या स्पर्शात साठवायला व्यस्त होते. तिचे केस त्याच्या मानेवर विसावले होते आणि त्याचे ओठ मात्र तिचे शरीर कवेत घेण्यास अधीर. मानेवरून धावणारी बोटं तिच्या टीशर्ट मध्ये सारखी रुतत होती. त्याला ती रोजच हवी होती. पोटावर गुदगुल्या केल्या की गालावरच्या खळ्या खिदळत होत्या. तिचे कानात फुलणारे गरम श्वास आणि तो जास्तच खुळावत होता. अजून वाट पाहणं त्याला शक्यच नव्हतं. अचानक तो उठला आणि म्हणाला चल निघू. तिचा कुठे हा प्रश्न त्या लाटांच्या आवाजाने गिळून टाकला कदाचित. पहाटेस उगवलेला एकटाच शुक्र तिला काही सांगू पाहत होता. तडफडून उड्या मारणारे ते खारट थेंब तिला अडवू पाहत होते. स्त्रीटलाईट्स मधून रस्त्यावर सांडलेला पिवळा प्रकाश तिच्या अंधारलेल्या मनाला डोळस व्हायची वाट पाहत होता. त्या खवळलेल्या समुद्राचं न ऐकता ती त्याच्या पाठोपाठ निघाली.. समुद्राला पाठ करून. कदाचित कायमची?
तिच्या बागेत फिरत असताना त्यातली एक कळी त्याने खुडून तिच्या समोर धरली. त्या कळीची एक एक पाकळी उलगडताना तो एक एक वचनं तिला देत होता. अवेळी खुललेली ती कळी तिच्यासारखीच गोंधळली होती. त्याने चक्क तिला मागणी घातली होती …लग्नासाठी!
आज त्याच्या डोळ्यांत गुलाब फुलले होते.. अन तिच्या शरीरावर काटे. आज तिला उमगला होता प्रेमाचा खरा अर्थ. त्याच्या विरहाचे सुख ती रोज दिवसा अनुभवायची पण आज तिला नव्याने कळत होतं ते विरहाचे दुःख. तिच्या लाडक्या बागेला सोडून ती कशी जाऊ शकत होती? तिचं प्रेम त्याच्यापेक्षा जास्त तिच्या बागेवर होतं हे आज तिला समजत होतं. गुलाब सारे तिच्या लग्नात सजायला आणि सजवायला आतुर होऊन बसलेले. आणि मग तो आला… तिच्या डोळ्यातला अश्रू. प्रेम इतकं महाग असतं हे आज तिला समजत होतं. दहा रुपयाला समुद्रावर प्रेम विकणं वेगळं आणि प्रेमात पडल्यावर स्वतःच मनच प्रियकराला विकण वेगळं. पण तिने निर्णय घेतला होता.
तिच्या गुलाबांसाठी. गुलाबांच्या प्रेमासाठी. प्रेमातल्या त्याच्यासाठी. त्याच्या डोळ्यातल्या विश्वासासाठी. आज जगली होती ती. सारं सारं जीवन एका दिवसात भोगली होती.
– मृगा वर्तक