यवतमाळ | दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील श्री मुंगसाजी महाराज समाधीस्थळ व वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील श्री संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकासाचा मार्ग ४४ कोटींच्या प्रशासकीय मान्यतेनंतर अखेर मोकळा झाला. अनुक्रमे यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील या दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून धामणगाव देवसाठी १९ कोटी आणि पोहरादेवीकरीता २५ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळविली. ग्रामविकास विभागाने२२ नोव्हेंबर रोजी या संदर्भात शासन आदेश काढला. त्यामुळे संजय राठोड यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या दोन्ही तीर्थस्थळी लवकरच ‘देवसागर’ व ‘सेवासागर’ प्रकल्प उभे राहणार आहेत.
दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे श्री मुंगसाजी महाराजांची समाधी असून महाराष्ट्रासह विविध राज्यातील लाखो भाविक दरवर्षी येथे भेट देतात. त्यामुळे या ठिकाणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध होऊन भाविकांना या तीर्थक्षेत्री विरंगुळा म्हणून ‘देवसागर’ प्रकल्प निर्माण करण्यासाठी संजय राठोड यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. यवतमाळचे पालकमंत्री असताना त्यांनी धामणगाव देवचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला.
वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी हे तीर्थक्षेत्र बंजारा समाजाची काशी म्हणून देशात ओळखले जाते. देशभरातून येथे दर महिन्यात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे पोहरादेवी येथे भाविकांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्या म्हणून संजय राठोड यांनी पोहरादेवी विकास आराखडा तयार करून तोही जिल्हाधिकारी वाशीम यांच्या मार्फत शासनाकडे सादर केला. २०१५ च्या बजेटमध्ये या दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधीची तरतूद करवून घेतली. त्यांनतर दोन्ही प्रस्तावांना प्रशासकीय शासनस्तरावर विविध अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र या दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा निश्चय केल्याने संजय राठोड यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री, ग्रामविकासमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधी मंजूर करून घेतला.
धामणगाव देव येथील विकासासाठी मंजूर झालेल्या १९ कोटींच्या निधीतून दर्शनबारी, भक्तनिवास, बालोद्यान, प्रसाधनगृह, पोहोचमार्ग, रस्तेविकास, नाल्या, पाणीपुरवठा, विद्युतपुरवठा, पालखीमार्ग, सभामंडप, सीसीटिव्ही, सौंदर्यीकरण असे विविध कामे केली जाणार आहेत. पोहरादेवी येथील विकासासाठी मिळालेल्या २५ कोटींच्या निधीतूनही याच पद्धतीची कामे होणार आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधीची तरतूद करून मंजुरी दिल्याबद्दल ना. संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, ना. दादा भुसे, ना. मदन येरावार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून ही दोन्ही तीर्थस्थळं अव्वल दर्जाची क्षेत्रं म्हणून नावारूपास आणू, असा विश्वास व्यक्त केला.