सांगली | सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे आज सकाळी पद्मभूषण क्रांतीवीर डॉ नागनाथअण्णा नायकवाडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पाची क्षमता ३०,००० लीटर प्रति दिवस इतकी आहे. यावेळी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे सुद्धा उदघाटन झाले. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत यांनी पद्मभूषण क्रांतीवीर डॉ नागनाथअण्णा नायकवाडी यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली अर्पण केली.
पद्मभूषण क्रांतीवीर डॉ नागनाथअण्णा नायकवाडी यांच्या स्वातंत्र्य लढयातील योगदानाचे स्मरण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या क्रांतिवीरांच्या भूमीला वंदन करताना मला प्रेरणा मिळाली आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण कुटूंबासह या लढ्यात झोकून दिले होते. ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर सुद्धा पद्मभूषण क्रांतीवीर डॉ नागनाथअण्णा नायकवाडी यांनी समाजाच्या कल्याणासाठी योगदान दिले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी हा साखर कारखाना स्थापन केला पण त्यात कधीही प्रवेश केला नाही. तो शेतकऱ्यांनीच चालविला पाहिजे, हाच त्यांचा आग्रह राहिला.
खऱ्या अर्थाने ते संपूर्ण आयुष्य राष्ट्र आणि समाजासाठी जगले. राज्य सरकारने त्यांच्या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात ४ कोटी रुपये दिले आहेत आणि दुसऱ्या टप्प्यात १६ कोटी रुपये दिले जातील.