प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हातरी कुठेतरी ‘त्या’ अल्लड वयात ‘ती’ किमया घडते. पण माझ्या मते, त्यासाठी वयाचं बंधन नसतं, तो एक झुळुक वारा असतो जो देहाला स्पर्श करून जातो, थांबला तर थांबतो, नाहीतर क्षणिक सुख ठरतो!
‘ती’ किमया असते, म्हणूनच खास असते. नजरेला हवी असणारी, पापण्यात सामावून घेणारी, हृदयात कैद असलेली आणि आपल्याला क्षितिजापलीकडे न्हेणारी, किमया असते. हसू येईल बहुदा ऐकताना, पण मनाला सुखावणारी एक सुंदर अनुभुती असते. मनात प्रितीचा फुलोरा डुलत असतो आणि सोबतीला मयुरपंख सतत असतो.
जेव्हा प्रेमाचा मयुरपंख असतो मनी, तेव्हा इतर काहीच आठवत नाही. डोक्यात भिरभिरणारा विचार असतो आणि गालावर खुदकन खिलणारी लाली असते. आरशासमोर उगाच मुरडावेसे वाटते, तर केस सावरायला नेहमी ‘त्याची’ बोटं हवी असतात. भेटण्याची ओढ असते, मग भेटून उगाच रुसण्याची हौस असते. पावसाळा असो वा हिवाळा असो, मानात मौसम मात्र गुलाबी असतो! ओठांवर सतत गाणी असतात, त्याला जुळवून पाहाणाऱ्या आठवणी असतात. सुखाचे क्षण कवेत घ्यावेसे वाटतात, आणि कवेत गेल्यावर सारं जग एकीकडे आणि कवेत मिळणारं उब एकीकडे!
जेव्हा प्रेमाचा मयुरपंख असतो मनी, तेव्हा खात्री असते सतत मनाला आणि भिती नसते कसलीच,
जेव्हा प्रेमाचा मयुरपंख असतो मनी….
– प्राची मोहिते
(लेखिका द व्हाईस ऑफ मुंबई ग्रुपची प्रतिनिधी आहे)