मुंबई | सामाजिक परिवर्तनासाठी विविध प्रकल्पांसाठी आज ३४ सामंजस्य करार करण्यात आले. विविध कंपन्या/ट्रस्ट यांनी आपल्या सामाजिक दायित्वातून हे करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केले. आरोग्यसेवा, शिक्षण, पशुसंवर्धन, जलसंवर्धन इत्यादी क्षेत्रातील हे करार आहेत. गरजूंच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी हे एक फार मोठे पाऊल आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. मंत्री सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, विष्णू सावरा, महादेव जानकर, रणजित पाटील तसेच श्रीमती राजश्री बिर्ला, टाटा सन्सचे अमित चंद्रा, टाटा पॉवरचे अनिल सर्धाना, राजेश झुनझुनवाला, राधाकिशन दमानी, वल्लभ भन्साली, हेमेंद्र कोठारी इत्यादी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जातात. पण त्याला खाजगी क्षेत्राची जोड लाभल्याने अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता राखता येईल. शिवाय, क्षमता, ज्ञान, काम करण्यातील लवचिकता, तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य याची सुध्दा मदत लाभेल. विकासाच्या प्रक्रियेला यामुळे गती देता येईल. आज शेतीच्या क्षेत्रात अस्थिरता असण्याचे कारणच मुळी शाश्वततेचा अभाव आहे. जलसंधारणाच्या क्षेत्रात म्हणूनच अधिक जोरकसपणे प्रयत्न हाती घेण्यात आले आहे.
आदिवासी बालकांना सकस आणि पौष्टिक आहार या क्षेत्रात सुध्दा मोठे काम करण्याची गरज आहे. खाजगी क्षेत्राने हा पुढाकार घेऊन राष्ट्रकार्याला हातभार लावला आहे. या सर्वांचे मी अभिनंदन करतो. यावेळी श्रीमती राजश्री बिर्ला यांनी गडचिरोलीतील गावांना मॉडेल गावं म्हणून विकसित करण्यासाठी ३ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना दिला. आजचे सर्व सामंजस्य करार मिळून सुमारे ७५ लाखावर नागरिक लाभान्वित होणार असून ३३५ कोटी रुपयांहून अधिकचे हे उपक्रम आहेत.