मो-यांना पराभूत करुन,
सिद्धिच्या विरोधात उभा.
शिवबाचे चरण लाभलेला,
रौद्ररुपी लिंगाणा !
काही तासांपूर्वी ज्या अभेद्य किल्ल्याकडे पाहून मनात धडकी भरली होती, आता चक्क त्याच किल्ल्यावर मी धापा टाकत पोहोचत होते. दोन पावलांपुढे तो तिथे भगवा झेंडा फडकत होता, माझ्यातला होता नव्हता तो सगळा माज माझ्या शिवरायांनी बांधलेल्या लिंगाण्याकडे पाहून नतमस्तक झाला. लिंगाणाच्या माथ्यावरून खाली फक्त खोल दरी दिसत होती आणि माणसं म्हणाल तर मुंग्यांएवढी चिमुकली दिसत होती. “खरच हा अभेद्य आणि ट्रेकर्सच्या दृष्टीने अवघड मानला जाणारा किल्ला तु चढलीस?” आणि असे बरेच प्रश्न मला सारखे पडत होते.
लिंगाणा किल्ल्याचा माथा
रडत झडत का होईना हा किल्ला मी चढले याचा आनंद एकीकडे आणि आता पुन्हा चढलेय तसच उतरायचे ही आहे या चिंतेने माझा जीव वर खाली होत होता. भटक्यांची संख्या जास्त असल्यामुळे खाली उतरण्यासाठी सगळे रांगेत बसले होते. त्यात मी धाडसी, माथ्यावर पोहोचणारी शेवटून पहिली असल्यामुळे उतरताना ही रांगेत शेवटी बसलेले. सकाळचे १० वाजत आले होते आणि उन माथ्याशी आलं होतं. अंगात थकवा असल्यामुळे बसल्या बसल्या मी कधी पेंगू लागले कळलच नाही. डोळे मिटताच मुंबईपासून ते लिंगाण्यापर्यंतचा प्रवास डोळ्यांसमोर आला.
आता ट्रेक सुरु करून वर्ष होत आलं. बोटावर मोजण्याइतके गड-सुळके सर केले. त्यातला एक ही लिंगाण्याएवढा थरारक नव्हता म्हणा, पण लिंगाणा करायचाय हे सुरुवातीलाच ठरवलेलं. माझ्या भटकंती परिवाराने लिंगाणा ट्रेक कळवताच मी तयार झाले जायला. उत्तम ग्रीप असलेले शूज आणि थोडसं धाडस बॅगेत भरून दादरवरून आमची स्वारी निघाली मोहोरी गावाकडे. लिंगाणा म्हणजे रायगड जिल्ह्यात वसलेला महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा किल्ला . जर रायगड राजगृह तर लिंगाणा कारागृह, एवढं त्याचं महत्त्व आहे. शिवकाळात इथे कैद्यांना कैद केलं जायचं इथवर माहिती गूगल दादाने दिली होती. समुद्र सपाटीपासून जवळ जवळ ३,००० फूट उंच लिंगाणा किल्ला, रायगड,तोरणा आणि दुर्गराज रायगड किल्ल्यांनी वेढलेला आहे. आम्ही रायगडावरून जात असल्यामुळे आम्हाला मोहोरी गाव लागणार होतं. आम्हां भटकंती परिवाराची ही पहिली मोहीम असल्यामुळे गावकऱ्यांना विचारत रस्ता चाचपत मोहोरी गावात पोहोचलो. बसमधून बरेच सुळके दिसत होते, तेवढ्यात गूगल दादाने दाखवलेला लिंगाणा किल्ला लांबून दिसला. त्याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्याचं नाव लिंगाणा असावं, पण लांबूनच त्याच्याकडे पाहून मी हळूच आवंढा गिळला. “राम भरोसे” म्हणत आम्ही लिंगाणाच्या दर्शनासाठी पुढे निघालो.
मोहोरी गावातल्या एका घरात फ्रेश झालो आणि आमच्या टेक्निकल टीमशी आमची ओळख झाली. रत्नागिरीमधली ही मंडळी ~’जिद्दी माऊंटेनीयर्स’ म्हणून ओळखली जाते, आणि या मोहिमेसाठी तेच आम्हाला साथ देणार होते. सत्या दादा आणि जिद्दी टीमच्या गणेश दादाने ट्रेकिंग आणि माउंटेनियरींग विषयी महत्त्वाच्या सुचना दिल्या मग तशीच आम्हा भटक्यांची स्वारी निघाली लिंगाण्याकडे. प्रत्येकाने आपापले हेल्मेट, स्लींग ,हार्नेस, कॅरॅबिनर सोबत घेतले. आम्हाला लीड करण्यासाठी सत्या दादा, भूषण दादा, गणेश दादा आणि जिद्दी टीमचे गणेश दादा आणि चिमुकली, पण हुशार जुई होती.
संध्याकाळचे ४ वाजत आले होते, पुढे वाटेत काळोख नको मिळायला म्हणून पटपट पाय उचलायला सांगितले. लिंगाण्याकडे जाणारी प्रत्येक वाट मला चिपळूणच्या नागेश्वरी गुंफेची आठवण करून देत होती. मोकळी पायवाट, चोहीकडे दूरवर पसरलेले सुळके आणि मंद वारा एक वेगळीच उर्जा देत होती. मित्रांबरोबर गप्पा मारता मारता काही पावले चालल्यानंतर मी, कविता, भूषण दादा, साहिल,सागर, प्रकाश, हेमेंद्र, जॉन आणि विपूल वाट चुकलो होतो. एका ऐसपैस पठारावर आम्ही पोहोचलो. तिथून मावळता सूर्य दिसला. चुकून का होईना, असं दुर्मिळ दृष्य नजरेस लाभलं!
रायलिंग पठारावरून दिसणारा सुर्यास्त
शेवटी वॉकी टॉकीच्या मदतीने सत्या दादा आणि मंडळी आम्हाला सापडली. असे कसे वाट चुकलो म्हणून हास्याची लाट पसरली आणि पुन्हा किल्ला लिंगाणा मोहीमेकडे पायपीट करू लागलो.
चालता चालता मध्येच काहींचा वेग कमी झाला. पुढे जाऊन पाहाते तर काय, दूरवर पसरलेली खोल दरी, बोऱ्हाट्याची नाळ. ती अख्खी वाट दगड नगरी होती. दोन्ही बाजूने अंगावर येणारे डोंगर आणि वाटेत आळी पाळीने येणारे रानटी झाडे, छान शांत नाळ आहे ती. आम्हाला बोऱ्हाट्याची नाळ उतारायची नव्हती तर तिथूनच उजवीकडे डोंगराला विळखा घालत लिंगाणाच्या पायथ्याकडे जायचं होतं. नाळीत असतानाच गुडुप अंधार झाला होता. सगळ्यांचे हेड टॉर्च बाहेर आले. बोऱ्हाट्याची नाळ पार करून मग काही अवघड रॉक पॅच आले. ते तसे अवघड नव्हते, पण अंधार झाल्यामुळे रॉकवर असलेले ग्रीप शूजने चाचपावे लागत होते. त्या रॉकला दोरी बांधली होती जेणेकरून कोणाचा तोल गेला तरी दरीत पडण्याची भिती नव्हती. तसेच दोन ते तीन रॉक पॅच पार करून पुढे पायवाट लागली. एव्हाना गार वारा सुटला होता. डोंगराच्या कडेतून चालताना भिती वाटत होती आणि माती ही भुसभुशीत असल्यामुळे पाय घसरत होते.
बोऱ्हाट्याची नाळ
तिथून एकीकडे टॉर्चचा प्रकाश दिसू लागला, आमचीच काही मंडळी तिथे आधी पोहोचून आराम करत होती. पडत घसरत आम्ही देखिल लिंगाण्याच्या पायथ्याशी पोहोचलो. त्या गुडुप अंधारात ही लिंगाणा ऐटीत तेजस्वी वाटत होता, जो उजेडात दिसणाऱ्या लिंगाणापेक्षा काही कमी थराराक नव्हता.
आता एवढं चालत आल्यानंतर तहान आणि भूक दोघेही दंगा करू लागले होते. आता सकाळी हा किल्ला कसा सर करायचा याचा अंदाज घेत आम्ही जेवून घेतलं. किल्ल्यावर चढताना कोणत्या वस्तू कशा वापरायच्या ते सांगण्यासाठी जिद्दी टीमचे सदस्य आम्हाला छोटा डेमो देत होते. तेव्हा मला प्रश्न पडला की गावातून ट्रेक सुरु करताना हे तर नव्हते, मग हे इथे पोहोचले कधी? विचारल्यावर समजलं की गेल्या दोन दिवसांपासून ते तिथेच होते आणि आतापर्यंत किमान दोनदा त्यांची लिंगाणाला चढ उतर झाली होती. ऐकून कौतुक वाटलं म्हणा, पण आता हे आपल्याला ही करायचय या विचाराने मला थंडीमध्ये घाम फुटला. आम्ही जास्त भटके असल्यामुळे रात्रीच क्लायंबिंग सुरु करूया असं म्हणाले. मी गपगुमान जेवले आणि स्लीपिंग बॅगमध्ये लपून झोपले!
छान स्वप्न पडलं की लिंगाण्याला जाण्यासाठी हरिहर गडासारखे पायऱ्या आहेत, स्वप्नात खुश झाले मी!
पहाटे ३ वाजता जाग आली तेव्हा पाहिलं तर अर्धी मंडळी पुढे निघून गेली होती आणि आता उरलेल्या ट्रेकर्सना ही क्लायंबिंगला सुरुवात करायची होती. भली मोठी बॅग बाजूला ठेवली, स्वेटर शर्ट घातला, लहान बॅगेत पाणी आणि खाऊ घेतलं, हार्नेस घातलं, हेल्मेट बांधलं आणि टॉर्च माथ्याला लावून वर चढण्यासाठी रांगेत उभे राहिले. जिद्दी टीमच्या अरविंद दादाने सांगितल्याप्रमाणे हार्नेसला स्लिंग लावून कॅरॅबिनर लावला आणि तो कॅरीबीनर किल्ल्याला ॲंकर असलेल्या दोरीला लावला. एका पाठोपाठ एक पहाटे ३:३०च्या दरम्यान आम्ही रोपच्या साह्याने क्लाईंबींग सुरु केली. गुडुप अंधार होता, टॉर्च ने वाट शोधत जमेल तेवढे दगड वाट चढत गेले. एका ठिकाणी डगडांमधला अंतर वाढला तेव्हा मदतीचा हात मिळाला. पुढे दगडांमधला अंतर वाढतच गेला, माझ्या लहान उंचीमुळे आणि भितीमुळे एकंदरीत मला चढताना अडथळा येऊ लागला. त्यात टॉर्च एकसारखा खाली पडत होता. माझ्या मागेच असणारा भरत सारखा बिचारा माझी टॉर्च उचलून देत होता. जस जसं आपण वर चढतो तस तसं जूमर नावाचा सपोर्टर वर खेचायचा असतो. खरं तर हा सपोर्टर अगदीच चढता येत नसणार्यांसाठी असतो, आणि त्याची गरज दुर्दैवाने मला पडत होती. पहाटेच्या अंधारात घाबरलेल्या जीवाला साथ होती ती जिद्दी टीमच्या प्राचीची आणि धीरज सरांची. “घाबरू नको प्राची, हळू हळू चढ वरती. मी आहे ना,पडणार नाहीस तु” असं म्हणत धीरज सरांचा हात नेहमी होता मला वर खेचण्यासाठी. एका पाठोपाठ एक ४-५ असेच कठिण रॉक पॅच चढून आम्ही गुंफेकडे पोहोचलो. त्या दिवशी वेड्यासारखा वारा सुटला होता. थंडी तर अंगाला छळणारी होती. एवढे कठिण पॅच चढून तसा ही अंगात त्राण उरला नव्हता, म्हणून गुंफेकडे पोहोचून एक छान झोप काढली. डोळे उघडले तेव्हा सुर्योदय पाहायला मिळाला,थंडी जरा कमी झाली होती आणि आता टॉर्चची गरज लागणार नव्हती म्हणून मी आणि भरत पुढे निघालो. पुढे पुन्हा तसेच पॅच होते. मागे अंधारात दगडांमधला अंतर फक्त जाणवत होता, आणि आता तो अंतर उघड्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे, तेच खाली पाहिलं तर खोल दरी… माझं तोंडातलं पाणी सुकलं!
गुंफेवरून दिसणारा सूर्योदय
हार्नेस आहे, जूमर आहे तरी मला वेड्यासारखी भीती वाटत होती. तरी ही प्राची, गणेश दादा आणि यावेळी जिद्दी टीमचा भूजंग दादा मला प्रोत्साहीत करत होते. त्यांचे शब्द कानावर पडल्यामुळे मी प्रयत्न केला. प्रत्येक पावलावर तो “व्हेरी गूड” म्हणायचा, मग मला मजा यायची. मग पुढे अजून एक असा पॅच आला जिथे माझी हालत पार खराब झाली. “दादा मला खाली उतरव, मला जमणार नाही” असं म्हणून मी हार मानेन तेवढ्यात भूजंग दादाने मला सर्रकन वर खेचलं, “हे काय, पोहोचलीस ना? उगीच घाबरतेस” मला हसू आणि रडू दोन्ही येत होतं. एकदा एक पॅच वर चढल्यावर उभां राहण्यासाठी फारशी जागा नव्हती. हारनेसला लागून असलेला कॅरॅबीनर सतत ॲंकर केलेला असावा, नाहीतर तोल जाण्याची शक्यता असते.
लिंगाण्याला जाण्यापूर्वी वाचनातून आल्याप्रमाणे कुठेच पाण्याचे कुंड आढळले नाही. आणि तेव्हा समजलं महाराजांनी राज्यावर लक्ष ठेवण्यासाठी बनवलेल्या लिंगाण्याची दशा इंग्रजांनी पार वाईट केली आहे. असो, यापेक्षा जास्त विचार करण्याची क्षमता त्यावेळी नव्हती माझ्यात. असेच ४-५ पॅच अजून आले जिथे रडत आणि फक्त रडत मी ते चढले. एक वेळी वाटत होतं, मी किती छळतेय यांना तरी ही कुठेच चीडचीड नाही की रागवणं नाही. एवढ्या उंचीवर येऊन ही नम्रता मात्र जमिनीला टेकलेली होती त्यांच्यात. पुढे काही अरुंद अडगळीची वाट आली, एकावेळी एकच व्यक्ती चालू शकते अशी, आणि दोन्ही बाजूला खोल थरथरती दरी. शेवटी चालता चालता सत्या दादा आणि इतर मंडळी दिसली. ते खाली उतरण्याच्या तयारीत होते, आणि मी अजून पोहोचतच होते.
“उठ गं, उतरायच नाही का खाली?” असं म्हणत पॅडीने मला झोपेतून उठवलं. डोळे मिटलेले तेव्हा येतानाचा प्रवास आठवला आणि आता चक्क खाली उतरायचं होतं. पुढे जरा सरकत गेल्यावर समजलं की रॅपल डाऊन करायचंय, जे आम्ही सांधन वॅलीला ही केलं होतं. तेव्हा कुठे जाऊन जीवात जीव आला. यावेळी जूमर बाजूला ठेवला आणि हार्नेसला डिसेंडर लावून रॅपलिंग करायला सुरुवात केली. पायामध्ये अंतर, कमरेकडून मागे झोकून देणं आणि पाय ९० अंश ताठ अशा पद्धतीत रॅपल करायचं. हा अनुभव सांधनपेक्षा खूप वेगळा आणि चॅलेंजिंग होता. रॅपलिंग करून पहिले दोन पॅच उतरले, तेव्हा तिथून एक पठार दिसत होता, पॅडी म्हणाला, “हा बघ हा ‘रायलिंग पठार’ तुम्ही जिथे वाट चुकून पोहोचला होता. इथे माणसं कँपिंगसाठी येतात.” ऐकून छान वाटलं, काही वेळापूर्वी याच पठारावरून मावळतीला आलेला सूर्य पाहिला होता.
लिंगाणा किल्ल्यावरुन दिसणार रायलिंग पठार
पुढचे दोन पॅच पुन्हा रॅपल करणार तेवढ्यात एक दुसरा ट्रेकिंग ग्रूप येऊन पोहोचला होता. त्यांच्यात एक सहावीत शिकणारा मुलगा ही होता, जो माझ्या समोरून पळत लिंगाण्याच्या माथ्याशी गेला. मी त्याच्याकडे पहातच राहिले!
पुढे पुन्हा रॅपल करत खाली उतरले, मग समजलं, की आता पुढचा टप्पा ऱॅपल न करता फक्त रोपच्या साहाय्याने खाली उतरायच आहे. आधी खूप भिती वाटली. काही काळ त्या मोठ्या दगडावर शोलेच्या सांभासारखी बसून विचार करत होते, उतरायचं की नाही? पण दुसरा पर्याय ही नव्हताच म्हणा! उतरले, घाबरत, रडत. पुढे पुन्हा रॅपल करायची वेळ आली तेव्हा खालून एक ट्रेकर वर चढण्यासाठी घाई करू लागला. आणि नेमकी मीच भेटले त्याला, त्याच्या अती घाईमुळे माझा तोल गेला आणि हार्नेसला उलट सुलट होऊन दगडाला आपटत लटकत राहिले. सगळे घाबरले पण मला माहित होतं, मला काहीच झालां नाही, म्हणून मी खिदी खिदी हसू लागले. माझ्याबरोबर सगळेच हसू लागले मग.
काही ठिकाणी भिती वाटल्यावर गणेश दादा आणि भूषण दादा खंबीरपणे मदतीला उभे होते. बघता बघता कठिण लिंगाणा मी ऱॅपल करत व रोपच्या साहाय्याने खाली उतरले. मग शेवटचा भुसभुशीत मातीचा पॅच आला, तिथे प्रत्येक ट्रेकप्रमाणे घसरून पडले. आता कुठे ट्रेक केला असं वाटू लागलं.
थकून माकून आलेले भटके
मी लिंगाणा सर केला याचा जयघोष करण्यासाठी पायथ्याशी कोणीच नव्हतं, कारण संध्याकाळचे ५ वाजले होते आणि सगळे गावाकडे परतीला लागले होते, मी शेवटून पहिली होती! दहा एक मिनिटे थांबून, पाण्याचा घोट पिऊन मोठी बॅग उचलली आणि पुन्हा बोऱ्ह्याट्याच्या नाळीकडे जायला निघाले. आता माझ्याबरोबर भटकंती परिवाराचा गणेश दादा, सागर, भूषण दादा, कविता, मंजू, पॅडी आणि जिद्दी टीमची जुई होती. गप्पा मारत मारत कधी दरी चढलो समजलच नाही. आता अंधार झाला होता, एकंदरीत २४ तासात हा ट्रेक मी पूर्ण केला होता. पुन्हा कालच्या वाटेवरून पायपीट करत गावाकडे पोहोचलो.
फ्रेश झालो, मनोगत व्यक्त करताना भटकंती परिवाराला आभार व्यक्त केला आणि सोबतच ‘सॉरी’ व ‘थॅंक्यू’ चा वर्षाव करत खरच मनापासून जिद्दी माऊंटेनियरींग टीमचं तोंड भरून कौतुक केलं.
आता या क्षणी माझ्याजवळ लिंगाण्याच्या आठवणीच नाहीत तर, त्याने दिलेलं बळ आणि धैर्य आहे. मी यापुढे कोणत्याही प्रसंगाला घाबरणार नाही असं ठामपणे सांगत नाही, पण कुठेच हार मानणार नाही हे मात्र गर्वाने सांगेन.
– प्राची मोहिते
(लेखिका द व्हाईस ऑफ मुंबई ग्रुपच्या प्रतिनिधी आहेत)