काही गोष्टी जन्मजात आपल्याला मिळालेल्या असतात त्यापैकीच एक आहे हार्मोन्स. ती वेगवेगळ्या भागातून स्त्रवली जातात व विशिष्ट ठिकाणी कार्यान्वित होतात.आपल्या वर्तणुकीवर,विचार प्रक्रियेवर यांचा खूप मोठा प्रभाव असतो.यापैकी काही महत्वाची हार्मोन्स जी आपल्या जीवनाचा खूप मोठा भाग आहेत त्याबद्दल जाणून घेऊ या.
टेस्टस्टेरॉन
पुरुषांचा राकटपणा,कणखरपणा, आक्रमकता,शरीराची विशिष्ट ठेवण व दाढी मिशा या टेस्टस्टेरॉन नावाच्या हार्मोन्सची किमया आहे. टेस्टस्टेरॉनच्या असण्या नसण्यावर प्रत्येक मानवाचं लिंग ठरत,स्वभाव व वर्तन ठरत.पुरुषाला पुरुषीपण देणार एकमेव हार्मोन्स म्हणजे टेस्टस्टेरॉन. पुरुष हे स्त्रियांपेक्षा जास्त आक्रमक असतात याच महत्वाच कारण म्हणजे टेस्टस्टेरॉन.ज्यावेळी पुरुष चिडतात त्यावेळी ते हिंसक बनतात याच महत्वाचं कारण म्हणजे टेस्टस्टेरॉन.या हार्मोन्सच्या प्रभावामुळे पुरुषांमध्ये आत्मविश्वास व आशावाद स्त्रियांपेक्षा जास्त असतो,त्यामुळे ते कमी भित्रे व कमी चिंतखोर असतात. परंतु हे हार्मोन्स पुरुषांना बऱ्याच वेळा गरजेपेक्षा जास्त आत्मविश्वासी,आत्मप्रौढ आणि आत्ममग्न बनवत हेही तितकंच खरं आहे. या संप्रेरकामुळे पुरुष जास्त आवेगशील व कोणत्याही गोष्टीसाठी धोका पत्करण्याची वृत्ती अंगी बाणवतात.
ऑक्सिटोसीन
हे हार्मोन्स मात्र टेस्टस्टेरॉनच्या विरुद्ध कार्य करत म्हणजे हे माणसाचा आक्रमकपणा कमी करत आणि प्रेम, जिव्हाळा वाढवत.विश्वासाची मुहूर्तमेढ ऑक्सिटोसीनविना रोवली जात नाही.त्यामुळे जिथे प्रेम,जिव्हाळा व विश्वासार्हता तिथे पडद्याआडून हे हार्मोन्स कार्यरत असत.ममत्वाची मधाळ माया प्रत्येक स्त्रीमध्ये दिसून येते कारण त्यांच्या शरीरात कार्यरत असणाऱ्या ऑक्सिटोसीनमुळे.
याशिवाय टेस्टस्टेरॉन व ऑक्सिटोसीन यांचं महत्व शारीरिक आकर्षक व भावनिक बंध वाढण्यासाठी होत. तरुण वयात या हार्मोन्स भरतीमुळे बरीचशी मुलं मुली आपल्या भावनांवर व शारीरिक आकर्षणावर बंधन न घालू शकल्यामुळे एकमेकांच्या प्रेमात पडून, शारीरिक संबंध निर्माण होण्यात याच पर्यावसन होत. जितकं जास्त प्रमाण या दोन हार्मोन्सच शरीरात वाढत जाईल तितकं शारीरिक आकर्षण प्रबळ होत जातं.
इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन
जस पुरुषांना टेस्टस्टेरॉन पुरुषत्व प्रदान करत तसच स्त्रियांना स्त्रीत्व प्रदान करणारे दोन महत्वाची हार्मोन्स म्हणजे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन. या दोन हार्मोन्सच्या कमी जास्त होण्याने स्त्रियांचं नैसर्गिक मासिक चक्र नियमित राहत.तसेच यातील ज्याचं प्रमाण शरीरात जास्त असेल त्यानुसार स्त्रियांच्या वर्तणुकीत व स्वभावात बदल घडतात.
वरवर जरी आपण सगळे सारखे दिसत असलो तरी आपल्या शरीरात कार्यरत असणारी हार्मोन्स आपल्यावर प्रभाव टाकून असतात,पण ते आपल्याला कधीच जाणवत नाही.
डॉ.कृष्णा सुभाष सपाटे
(लेखक द व्हाईस ऑफ मुंबई ग्रुपचे प्रतिनिधी आहेत)