मुंबई | फिर हेरा फेरी सिनेमाचे दिग्दर्शक, लेखक आणि प्रसिद्ध अभिनेते नीरज व्होरा यांचं आज पहाटे चारच्या सुमारास निधन झालं. नीरज यांचे मित्र फिरोज नाडियावाला यांच्या जुहूमधील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नीरज व्होरा यांना गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर, त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण यावेळी ते कोमामध्ये गेल्याने, त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. यानंतर त्यांचे मित्र फिरोज नाडियावाला यांनी त्यांना मुंबईतील आपल्या घरी आणलं होते. फिरोज नाडियावाला हेच त्यांची सर्व काळजी घेत होते. त्यांनी नीरज यांच्यासाठी आपल्या जुहू स्थित ‘बरकत व्हिला’मधील एका खोलीचे रुपांतर आयसीयूमध्ये केले होते. तसेच त्यांच्या देखभालीसाठी मार्च २०१७ पासून २४ तासांसाठी एक नर्स, वॉर्ड बॉय, कुक यांची नेमणूक केली होती. याशिवाय, फिजियोथेरिपिस्ट, न्यूरो सर्जन, अक्यूपंक्चर थेरेपिस्ट आणि जनरल फिजिशियन हे देखील त्यांची वेळोवेळी तपासणी करत होते.
ऑगस्ट महिन्युपासूनच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. पण आज पहाटे चारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नीरज यांनी फिर हेरा फेरी, खिलाडी ४२०, सारख्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. रंगभूमीवरही ते सक्रिय होते. गुजराती भाषेतील ‘आफ्टरनून’ नाटकात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. नीरज हे एक उत्तम लेखक देखील होते. त्यांनी रंगीला, अकेले हम अकेले तुम, ताल, जोश,बदमाश, चोरी चोरी चुपके चुपके, आवारा पागल दिवाना सारख्या सिनेमांसाठी संवाद लेखन केलं होतं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी हेराफेरीचा सीक्वेल हेराफेरी ३ वर काम करण्यास सुरुवात केली होती. पण प्रकृती अस्वास्थामुळे त्यात अनेक अडचणी येत होत्या.
– रवी खरात, प्रतिनिधी